डॉ.दाभोलकर खून प्रकरणी सीबीआयकडूनही तपास अपूर्णच ; डॉ. हमिद दाभोलकर यांची खंत

पुणे : अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला आज सात वर्ष पुर्ण होत आहेत. परंतु, सीबीआयकडून तपास पूर्ण झालेला नाही; ही बाब अत्यंत वेदनादायी असल्याची खंत डॉ. हमिद दाभोलकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.

डॉ. हमिद म्हणाले, डॉ. दाभोलकरांच्या खुनात संशयीत आरोपी म्हणून सीबीआयाने २०१६ मध्ये डॉ. विरेंद्र तावडे याला अटक केली. ऑगस्ट २०१८ मध्ये शरद कळसकर, सचिन अंदुरे, तर मे २०१९ मध्ये अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले. मात्र संशयीत आरोपी असलेल्या अमोल काळेवर अद्यापही आरोपपत्र दाखल केलेले नाही. खुनामागील सुत्रधार कोण आहे; हे सीबीआयने शोधून काढले पाहीजे, अन्यथा देशातील विवेकवादी विचारवंत, कार्यकर्ते यांच्या अभिव्यक्तीला असलेला धोका संपणार नसल्याचेही ते म्हणाले.

डॉ. दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कुलबुर्गी व गौरी लंकेश या चारही खुनांचे एकमेकांत धागेदोरे तपास यंत्रणांनी उकलले आहेत. त्यातील संशयीत आरोपीही समान आहेत. दोन समान शस्त्रेही गुन्ह्यात वापरलेली आहेत. तसेच न्यायवैद्यक शाळेच्या अहवालानुसार डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्यावर एकाच पिस्तुलातून गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. चारही खुनांच्या संदर्भातील शेवटची अटक जानेवारी २०२० मध्ये झालेली आहे. सीबीआयने पुरवणी आरोपपत्रामध्ये कॉ. पानसरे, प्रा. कुलबुर्गी, व गौरी लंकेश यांच्या खुनाशी असलेला संबंध रेकॉर्डवर आला आहे. त्यातून ही घटना केवळ खुनाची नसून दशहतवादी कृत्य असल्याचे सीबीआयचे म्हणणे असून, त्यानुसार बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायदा यात लावण्यात आला असल्याचे डॉ. हमिद दाभोलकर यांनी म्हटले आहे.