बाजार समित्या संपवण्याचा केंद्राचा घाट : आमदार दिलीप मोहिते पाटील

स्पर्धेत उतरून शेतकऱ्यांना सेवा द्या

राजगुरूनगर : केंद्र सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत असल्याने शेतकऱ्यांसह बाजार समित्या अडचणीत येत आहेत. शेतीमाल विक्रीचे निर्बंध उठल्याने शेती मालाची खुली विक्री होणार असल्याने बाजार समित्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होणार आहे. यासाठी सरकार विरोधात वाद घालण्यापेक्षा बाजार समित्यांनी स्पर्धेत उतरून शेतकऱ्यांना सेवा आणि सुविधा देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांसाठी किसान जलपान सेवा केंद्राचा शुभारंभ आमदार मोहिते यांच्या हस्ते मंगळवारी झाला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, उपसभापती धारू गवारी, सहायक निबंधक श्रीकांत श्रीखंडे, सचिव बाळासाहेब धंद्रे, संचालक विलास कातोरे, धैर्यशील पानसरे, अमर कांबळे यांच्यासह इतर संचालक व कर्मचारीवर्ग उपस्थित होता.

– बाजार समित्यांच्या आवारात व्यापारी संकुले उभारावीत
आमदार मोहिते म्हणाले, खेड तालुक्‍यात तीन धरणे आहेत, त्यात उत्पादित होणारे मासे मुंबई-पुणेच्या बाजारात जातात. त्यांना तालुक्‍यात बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न करावेत, बाजार समित्यांच्या आवारात व्यापारी संकुले उभारावीत.

सभापती विनायक घुमटकर म्हणाले, खेड बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी, व्यापारी, आडते, हमाल, मापाडी यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरविण्यात येत आहेत. सध्या सर्वत्र करोनाचे संकट असल्याने बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व्हेंटिलेटरची सेवा मिळावी म्हणून सहा व्हेंटिलेटर सरकारी रुग्णालयात देण्यात येणार आहेत. उत्पन्न वाढविण्यासाठी पाईट व राजगुरुनगर येथे व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे.

“भविष्यात बाजारात येणाऱ्या शेतकऱ्याला एक रुपयांत जेवण, चाकण मार्केटमधील गोडावून असलेल्या जागेत टोमॅटो मार्केट सुरू केले जाणार आहे. राजगुरूनगर आणि चाकण बाजारात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहे. चाकण येथे फ्रुट मार्केट उभारण्यात येणार आहे.”
– विनायक घुमटकर, सभापती, बाजार समिती खेड