चाकण-वांद्रा रस्ता पाण्यात

भांबोली फाटा ते वासुली फाटा येथील स्थिती
चाकण : सार्वजनिक बांधकाम विभागाचा चाकण-वांद्रा या मुख्य रस्त्याचा भांबोली ग्रामपंचायत हद्दीत मुख्य बाजारपेठ असलेला भांबोली फाटा ते वासुली फाटा हा २०० ते ३०० मिटरचा रस्ता संबंधित विभागाच्या गैरकारभारामुळे पुन्हा एकदा पाण्यात गेला आहे. या रस्त्यावर पाणी आणि चिखलमातीचे साम्राज्य पसरले असल्याने वाहनचालक बेहाल झाले आहेत. तर सार्वजनिक बांधकाम विभाग व एमआयडीसी प्रशासन यांनी सुवर्णमध्य काढून तातडीने रस्ता दुरुस्त केला नाही तर आंदोल करण्यात येईल, असा इशारा चाकण एमआयडीसी टप्पा दोनमधील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी दिला आहे.

– चिखलाचे साम्राज्य
येथील स्थानिक जागा मालकांनी दोन्ही बाजूला व्यापारी गाळे उघडले असून हे गाळे मुरुमाचा भराव टाकून मुख्य रस्त्यापासून अधिक उंचीवर असल्याने रस्त्याला खोलगटपणा आलेला आहे. तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी संबंधित विभागाकडून योग्य व्यवस्थापन केले गेले नाही. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचून राहते. उन्हाळ्यात रस्त्यावर खड्ड्यांची चाळण, दगड गोटे व धूळमातीमुळे सर्वांना शारीरिक व मानसिक आजाराला सामोरे जावे लागले. तर पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून रस्त्याचे अक्षरशः तळे झाले आहे. रस्त्याला ना गटर ना पाणी वाहून जाण्यासाठी मोरी. त्यामुळे चोहोबाजूंनी पाणी रस्त्यावर येऊन साचून राहत असल्याने स्थानिकांसह प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

– दोन विभागांच्या भांडणांत नागरिकांना त्रास
एमआयडीसी परिसरात सुसज्ज व विस्तारीत रस्ते असताना मात्र, भांबोली फाटा-वासुली फाटा ते भामचंद्र हायस्कूल पर्यंतचा रस्ता दुर्लक्षित राहिला आहे किंवा काहितरी प्रशासकीय अडचणी सांगून वेळकाढूपणा करीत आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभाग स्थानिक ग्रामपंचायत व एमआयडीसीवर खापर फोडून मोकळे होतात. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील प्रमुख जिल्हा मार्गाचा भाग आहे. परंतु एमआयडीसी परिसरातील वराळे, भांबोली, सावरदरी, खालुंब्रे, शिंदे व वासुली ही गावे एमआयडीसी बाधित असून येथील रस्ता दुरुस्ती व रस्ताविषयक अन्य कामे औद्योगिक विभागाने करायला हवीत, अशी अटकळ बांधून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत.
­

-रस्ता दूरुस्त करा
वासुली फाटा रस्ता म्हणजे रस्त्यावर पाणी की पाण्यात रस्ता आहे हे समजत नाही. एमआयडीसी व येथील बाजारपेठेमुळे या रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असते. अनेक वाहनातील इंजीनमध्ये पाणी जाऊन गाड्या नादूरुस्त झाल्या आहेत. तसेच साठलेल्या दूषित पाण्यामुळे आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होऊ शकतात. काम कोणीही करा पण रस्ता दूरुस्त करा.
सुरेश पिंगळे देशमुख, एक उद्योजक