राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून कोकण, गोव्यालाही अलर्ट

आगामी दोन दिवसांत घाटमाथ्याच्या परिसरात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळू शकतो. तर मध्य महराष्ट्रा, कोकण ,गोवा ,मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेकडून देण्यात आला आहे.

    पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेकठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच शेतीचेही मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर आगामी काही दिवस राज्यासाठी महत्त्वाचे असल्याचे मानले जात आहे.

    दरम्यान या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून पुणे जिल्ह्यात येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात विश्रांती घेतली आहे. मात्र, आगामी दोन दिवसांत घाटमाथ्याच्या परिसरात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळू शकतो. तर मध्य महराष्ट्रा, कोकण ,गोवा ,मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेकडून देण्यात आला आहे.

    राज्यात पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्राच्या परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. बंगालच्या उपसागरापासून तमिळनाडूच्या किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.

    दरम्यान कोकण आणि मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी जोरदार, तर बहुतांश भागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी पावसाचा जोर राहील, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

    मराठवाड्यात या भागात अलर्ट?

    2 ऑक्टोबर- या दिवशी परभणी, बीड, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात ढगांच्या कडकडाटासह काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.

    3 ऑक्टोबर- या दिवशी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर

    4 ऑक्टोबर – औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, परभणी व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता, मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान सल्ला पत्रकात वर्तवण्यात आली आहे.

    06 ऑक्टोबरला परतीचा पाऊस

    दरम्यान, हवामान विभागाने परतीच्या पावसाचा अंदाजदेखील व्यक्त केला आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास 06 ऑक्टोबरला सुरु होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाचे दिल्ली येथील तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्वीट करून याविषयी माहिती दिली. मान्सूनचा परतीचा प्रवास वायव्य भारताच्या काही भागांतून सुरु होईल.