परदेशात नोकरी लावण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांची फसवणूक ; एकाला अटक

दोघांनी नुकतीच पोलिसांकडे फिर्याद नोंदवली. या गुन्ह्याचा माग काढून आर्थिक व सायबर गुन्हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिन्द्र पंडित पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, हवालदार संदेश कर्णे, अस्लम अत्तार , मंगेश नेवसे व त्यांच्या पथकाने संशयित संशयित आरोपी जमदाडे याला पारनेर (जि. नगर)मध्ये सापळा रचून अटक केली. मुख्य सूत्रधार ढोरमले याच्यासाठी तो पैसे स्वीकारण्याचे काम करीत होता.

    पुणे : परदेशात नोकरी लावण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांची फसवणूक करण्याच्याप्रकरणी मुख्य सूत्रधारास अ सायबर क्राईम विभागाच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गुजरात पोलिसांनी त्याला यास्वरुपाच्याच गुन्ह्यात कारागृहात ठेवले होते. तेथून तपासासाठी पोलिसांनी त्याला पुण्यात आणले आहे.

    अनुप पंढरीनाथ ढोरमले ( ३० , रा. जातेगाव, जि. नगर ) असे आरोपीचे नाव आहे. ढोरमले याचा साथीदार विशाल मीनानाथ जमदाडे ( २४ , रा. पारनेर, जि नगर ) याला पोलसांनी गेल्या महिन्यात अटक केली होती. या दोघांनी फसवणूक केल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्यांनी राज्याच्या निरनिराळ्या भागांबरोबरच परराज्यातील तरुणांचीही मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचे प्राथमिक पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. तपासासाठी त्याला येत्या एक जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

    ढोरमले याने खासगी नोकरीविषयक केंद्र सुरू केले होते. त्या माध्यमातून विविध देशांमध्ये नोकरी लावण्यासाठी त्याने आकर्षक वेबसाईट तयार केली होती. त्या माध्यमातून तो विदेशांमध्ये नोकरीसाठी जाण्यास उत्सुक असलेल्या तरुणांची माहिती तो संकलित करून त्यांच्याशी संपर्क साधत असे. त्याच्या मिठ्ठास वाणीला भुलून आणि कार्यपद्धतीला फसून अनेकजण त्याच्याकडे नावांची नोंदणी करत असत. त्यांच्याकडून ऑनलाईन मुलाखत, व्हिसा, वैद्यकीय चाचणी शुल्क आदी बहाण्याने तो दिड ते पाच लाख रुपये उकळत असे.

    रक्कम ताब्यात आल्यावर तो त्यांचे संपर्क बंद करीत असे. मागील वर्षभरात त्याने यापद्धतीने अनेकांची फसवणूक केली. त्यापैकी दोघांनी नुकतीच पोलिसांकडे फिर्याद नोंदवली. या गुन्ह्याचा माग काढून आर्थिक व सायबर गुन्हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिन्द्र पंडित पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, हवालदार संदेश कर्णे, अस्लम अत्तार , मंगेश नेवसे व त्यांच्या पथकाने संशयित संशयित आरोपी जमदाडे याला पारनेर (जि. नगर)मध्ये सापळा रचून अटक केली. मुख्य सूत्रधार ढोरमले याच्यासाठी तो पैसे स्वीकारण्याचे काम करीत होता.