छत्रपती कारखान्याने थकीत एफआरपी व्याजासह द्यावी ; विशाल निंबाळकर यांची मागणी

कोरोना काळात शेतकऱ्यांची परिस्थिती नाजूक झाली आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे एफआरपीचे थकीत ४०० रुपये शेतकऱ्यांना आठ दिवसात जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे. कायद्याप्रमाणे ही रक्कम १४ दिवसांमध्ये देणे बंधनकारक आहे.

    बारामती: भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांची ४०० रुपये प्रति टन थकीत एफआरपी व त्यावरील व्याज तातडीने सभादांना द्यावे, अन्यथा कारखान्याच्या संचालक मंडळाने राजीनामे द्यावेत,अशी मागणी शेतकरी कृती समितीचे सदस्य ‌विशाल निंबाळकर यांनी केली आहे.

    याबाबतचे निवेदन कार्यकारी संचालकांना देण्यात आला आहे. कोरोना काळात शेतकऱ्यांची परिस्थिती नाजूक झाली आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे एफआरपीचे थकीत ४०० रुपये शेतकऱ्यांना आठ दिवसात जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे. कायद्याप्रमाणे ही रक्कम १४ दिवसांमध्ये देणे बंधनकारक आहे.ती अजूनही दिली गेली नाही. यामुळे आता या रकमेचे व्याजही दिले गेले पाहिजे. तशी तरतूद देखील कायद्यात आहे. असे निंबाळकर यांनी या निवेदनात म्हटले आहे. तसेच संचालक मंडळाची मुदत संपली आहे.यामुळे संचालक मंडळ हे पैसे देण्यात असमर्थ असेल तर संचालक मंडळाने राजीनामा देण्याची मागणी शेतकरी कृती समितीचे सदस्य विशाल निंबाळकर यांनी केली आहे. तसेच येणाऱ्या काळात ही रक्कम दिली गेली नाही तर आंदोलन केले जाईल,असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.