मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सर्वसामान्यांच्या अपेक्षांची पूर्तता करतील; आढळराव पाटलांचा विश्वास

    पिंपरी : महाविकास आघाडी सरकारचे यशस्वी नेतृत्व करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करतील. राज्यातील युवकांचे आशास्थान पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातून हजारो युवक भगवा झेंडा घेऊन शिवबंधनात येत आहेत. त्याचप्रमाणे भोसरीतील भाजप पदाधिकारी व काही माजी शिवसैनिकांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात शिवसेनेत प्रवेश होतील त्याची ही नांदी आहे. यामुळे भोसरी विधानसभेत शिवसेनेला गतवैभव प्राप्त होईल, असे शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.

    पिंपरी चिंचवड शहर शिवसेना प्रमुख ॲड. सचिन भोसले, शिवसेना भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. १२ जून) माजी खासदार आढळराव पाटील यांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश देऊन शिवबंधन बांधले. यावेळी त्यांचे स्वागत करताना आढळराव पाटील बोलत होते. यावेळी शैलेश उर्फ तुकाराम निवृत्ती मोरे, सुनिल भागुजी वाटे, श्रीकांत चन्नाप्पा करोली, बाबासाहेब गोविंद काळोखे, संदिप राघू चव्हाण, बटू काशीनाथ पाटील, किशोर अशोक शिनगारे, अशोक अश्रुबा चव्हाण, भारत एकनाथ नरवडे, संजय कृष्णा पाटील आदींनी शिवसेनेत प्रवेश केला.

    शिवसेना शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाच्या आणि मनपामधील पदाधिकाऱ्यांच्या कारभाराला जनता कंटाळलेली आहे. त्याचा निषेध करीत काही भाजप पदाधिकारी शिवसेनेत येत आहेत. भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या विश्वासू गटातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश म्हणजे आगामी काळात पूर्ण शहरातून अनेक कार्यकर्त्यांचे तसेच आजी, माजी नगरसेवकांचे प्रवेश होणार असल्याची चाहूल आहे. शहर शिवसेनेची ताकद मनपा निवडणूकीत वाढण्यासाठी नियोजन सुरु आहे. आज ज्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्याचा पक्षवाढीसाठी निश्चितच उपयोग होईल असेही ॲड. सचिन भोसले म्हणाले.