तळेगाव दाभाडेतील ‘त्या’ लाचखोर अधिकाऱ्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

    तळेगाव दाभाडे : लाचेची मागणी केलेले मुख्याधिकारी श्याम पोशेट्टी व उद्यान अधीक्षक विशाल मिंड हे पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात होते. या दोघांना बुधवारी (दि.२) शिवाजीनगर पुणे जिल्हा सत्र विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

    व्यायाम साहित्याच्या बिलाची रक्कम काढण्यासाठी ठेकेदाराकडून ९ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी असलेले पोशेट्टी आणि विशाल मिंड यांना बुधवारपर्यंत (दि.२) पोलिस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर आता अधिक तपासासाठी न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

    पोशेट्टी आणि मिंड यांनी लाच मागितल्याप्रकरणी सोमवारी (दि.३१) तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना मंगळवारी (दि.१) शिवाजीनगर पुणे जिल्हा सत्र विशेष न्यायालयाने बुधवार (दि.२) पर्यंत पोलिस कोठडी दिली. मुदत संपल्याने पुन्हा बुधवारी (दि.२) न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी आरोपी पोशेट्टी व मिंड यांना न्यायालयीन कोठडी देऊन येरवडा कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. या गुन्ह्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक अलका सरग करत आहेत.