तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ९ लाखांची लाच घेताना अटकेत

    तळेगाव दाभाडे : व्यायाम साहित्याच्या बिलाची रक्कम काढण्यासाठी ठेकेदाराकडून  लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व उद्यान पर्यवेक्षकाला अटक करण्यात आली होती. या दोघांना मंगळवारी (दि.१) शिवाजीनगर (पुणे) जिल्हा सत्र विशेष न्यायालयाने बुधवारपर्यंत (दि.२) पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, या गुन्हातील फरार उद्यान पर्यवेक्षक विशाल अंकुश मींड मंगळवारी (दि.१) सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयात हजर झाले.

    मुख्याधिकारी श्याम लक्ष्मण पोशेट्टी (वय ४०, रा. फ्लोरा सिटी तळेगाव दाभाडे या. मावळ) व उद्यान पर्यवेक्षक विशाल अंकुश मींड अशी पोलिस कोठडी सुनावलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलिस निरीक्षक अलका सरग यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत ठेकेदार यांनी विविध ठिकाणी व्यायाम साहित्य पुरवठा केल्याची एकूण ४ बिले नगरपरिषदेकडून ठेकेदाराला देणे होते. ती बिले काढण्यासाठी ९ लाख रुपयांच्या लाचेची मागणी विशाल मींड यांनी ठेकेदार यांच्याकडे केली. या मागणीला मुख्याधिकारी पोशेट्टी यांनी संमती दिली होती.

    संबंधित ठेकेदाराच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अलका सरग, सुनील बिले, पोलिस नाईक, वैभव गोसावी, महिला पोलिस कर्मचारी पूजा पागिरे व चालक दामोदर जाधव यांच्या पथकाने मुख्याधिकारी पोशेट्टी यांना अटक केली. तर मींड फरार झाले होते. मात्र, ते मंगळवारी (दि. १) सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे हजर झाले.

    तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

    लाच प्रकरणातील आरोपी मुख्याधिकारी पोशेट्टी व पर्यवेक्षक मींड यांना जिल्हा सत्र विशेष न्यायालयात सादर केले. साक्ष व पुरावे पडताळणी करून आरोपींनी ९ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलिस निरीक्षक अलका सरग करत आहेत.