कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर चाईल्ड हेल्पलाईन सुरु

    पिंपरी : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लहान मुलांसाठी चाईल्ड हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. या हेल्पलाईनचा शुभारंभ महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाला.

    शहरातील लहान मुलांना कोरोना आजाराबाबत सविस्तर माहिती मिळावी. त्यांच्या मनातील कोरोनाबाबतची भीती दूर व्हावी या उद्देशाने लहान मुलांकरीता शालेय विद्यार्थ्यांमार्फत संचालन होणारी चाईल्ड हेल्पलाईन सुरु करण्यात येत आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून लहान मुलांच्या कोरोनाविषयक शंकांचे निरसन होण्यास मदत होईल, असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

    सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या विशेष उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, आयुक्त राजेश पाटील, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती चंदा लोखंडे, नगरसदस्य तुषार कामठे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड उपस्थित होते. तर हेल्पलाईनचे संचालन करणारे विद्यार्थी, पालक, शिक्षक ऑनलाईन उपस्थित होते.

    महापौर म्हणाल्या, कोरोनाच्या पहिल्या आणि दुस-या लाटेचा समर्थपणे मुकाबला करत पिंपरी चिंचवड शहर नव्याने उभारी घेत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कोरोनाबाबत विविध उपाययोजना राबविल्या आहेत. नागरिकांच्या सोईसाठी विविध प्रकारच्या हेल्पलाईन सुरू केल्या आहेत. दरम्यान कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तविली जात आहे. यामध्ये लहान मुले बाधित होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या मनात कोरोनाची भीती असल्यास ती दूर करण्यासाठी तसेच कोरोनासंबंधी लहान मुलांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी ७७६८८००३३३ आणि ७७६८९००३३३ या क्रमांकाच्या चाईल्ड हेल्पलाईन सुरू करण्यात येत आली आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी ११ ते दुपारी १ वाजे दरम्यान ही हेल्पलाईन सुरु राहील. मुलांमध्ये कोरोनाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी या हेल्पलाईनचा जास्तीत जास्त उपयोग आपल्या पाल्यांनी करावा याकरीता पालकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन महापौर ढोरे यांनी यावेळी केले.