इंदापूर तालुक्यात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे : वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे

इंदापूर: इंदापूर तालुक्यातील उजनी धरणाच्या बॅकवॉटर भागात बिबट्या दिसल्याची चर्चा असल्याने या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी केले आहे.

इंदापूर: इंदापूर तालुक्यातील उजनी धरणाच्या बॅकवॉटर भागात बिबट्या दिसल्याची चर्चा असल्याने या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी केले आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे म्हणाले, इंदापूर तालुक्यातील उजनी धरणाच्या लगत सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका आहे. करमाळा,कर्जत तालुक्यात सध्या बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे. तालुक्यातील बाभुळगाव, हिंगणगाव, निमसाखर आणि भिगवण या भागात बिबट्याचा वावर असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु बिबट्याचे कोणत्याही खुणा मिळून आल्या नाहीत. वनविभागाचे कर्मचारी नागरिकांच्या माहितीच्या संदर्भात सखोल तपास करत आहेत.

उजनी धरणाच्या बॅकवॉटर लगत असलेली भिगवण, डिकसळ, तक्रारवाडी, पडस्थळ, अजोती, सुगाव, हिंगणगाव, बाभुळगाव आदी गावात विभागाचे कर्मचारी जाऊन ग्रामस्थांची चर्चा करत आहेत. तसेच ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली जात आहे असे सांगून राहुल काळे पुढे म्हणाले, उजनी धरणाच्या बॅकवॉटर भागातील ग्रामस्थांनी सतर्क राहावे. शेतीची कामे समूहाने करावे, दुपारच्या वेळेत करून घ्यावीत.
विनाकारण घराच्या बाहेर पडू नये, लहान मुलांना एकटे सोडू नये, जनावरांचे गोठे बंदिस्त करावेत तसेच घराला दोन फुटांपेक्षा जास्त उंच असे काटेरी कुंपण करावे; जेणेकरून बिबट्याला उंच झेप घेता येणार नाही. रात्रीच्या वेळी नागरिकांनी फिरताना हातात बॅटरी, शिट्टी असावी. तसेच मोबाईल वरती गाणी लावणे गरजेचे आहे असे काळे यांनी सांगितले.

इंदापूर तालुक्यातील सुगाव, पडस्थळ याठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आलेले आहेत. वनपाल व्ही.एस. खारतोडे, के.बी.धावटे, वनकर्मचारी गोरखा व झोळ असे दहा कर्मचारी बिबट्याचा शोध घेत आहेत. तसेच लोकांच्यामध्ये जनजागृती करत आहेत. बिबट्याचा वावर आढळून आल्यास किंवा एखाद्या जनावरांवर बिबट्याने हल्ला केल्यास जनावर तसेच ठेवावे त्वरित १९२६ टोल फ्री क्रमांकावर किंवा मोबाईल क्रमांक ९०४९२००२०० यावर संपर्क साधावा असे आवाहन राहुल काळे यांनी केले.