निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये : सहायक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

भिमाशंकर : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दि. ३ व ४ जूनदरम्यान निसर्ग चक्रिवादळ महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकणार आहे. यादरम्यान राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

भिमाशंकर :   हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दि. ३ व ४ जूनदरम्यान निसर्ग चक्रिवादळ महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकणार आहे. यादरम्यान राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने सर्व नागरिकांनी सुरक्षितपणे घरातच थांबावे, या कालावधीत भुस्खलन होण्याची व महापूर येण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी खबरदारी व घराच्या बाहेर न पडण्याचे आवाहन जुन्नर आंबेगाव विभागाचे सहायक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.  

जुन्नर व आंबेगाव हे दोन तालुके दक्षता क्षेत्रात येत असल्याने महाराष्ट्रात दि. ३ व ४ जुन दरम्यान निसर्ग चक्रवादळ येत असल्याने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत करावायाच्या उपाययोजना व घ्यावयाची दक्षता याबाबत दोन्ही तालुक्यातील विविध विभागांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी सहायक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी बोलत होते. निसर्ग या चक्रीवादळाचा तडाखा व अतिवृष्टीपासून संभाव्य बाधित कुटुंबांचे स्थलांतर करताना कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर पुणे व मुंबई तसेच इतर ठिकाणावरून आलेल्या लोकांचे विलगीकरणाबाबत खबरदारी घेवून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, तसेच स्थलांतर करताना कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर  सामाजिक अंतर ठेवावे.  

तसेच विदयुत विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी डोंगराळ भागातील गावांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी दुरूस्तीसाठी व समन्वयासाठी पथकांची व वाहनांची नेमणूक करावी. सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी संभाव्य धोक्याची ठिकाणे ओळखून त्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करण्यासाठी शासकीय व खाजगी जे.सी.बी. उपलब्ध करून त्यांचा संपर्क क्रमांक संबंधित प्रशासकीय कार्यालयास दयावे. वनविभागाने संभाव्य धोकादायक ठिकाणी पथके नेमून कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर इतर विभागातील अधिकारी कर्मचारी यांचेशी समन्वय ठेवून उपायायोजनेच्या दृष्टीकोनातून तात्काळ कार्यवाही करावी आदि विविध सूचना निसर्ग या चक्रीवादळाचा पार्श्वभूमिवर संबंधित विभागांना सहायक जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिल्या.