नागरिकांना मिळणार घरपोच जीवनावश्यक वस्तू

औषधी दुकाने वगळता किराणा, भाजीपाला, फळे आदि दुकाने राहणार बंद वाघोली : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी गेल्या चाळीस दिवसांपासून लोणीकंद पोलीस अहोरात्र परिश्रम घेत आहेत. कोरोना विरुद्धचा लढा

औषधी दुकाने वगळता किराणा, भाजीपाला, फळे आदि दुकाने राहणार बंद

वाघोली :  कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी गेल्या चाळीस दिवसांपासून लोणीकंद पोलीस अहोरात्र परिश्रम घेत आहेत. कोरोना विरुद्धचा लढा देण्यासाठी लोणीकंद पोलिसांकडून वार्डनिहाय टीम तयार करण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील जास्तीत जास्त नागरिकांनी घरीच थांबण्याच्या दृष्टीने नागरीकांच्या मागणीनुसार जिवनाश्यक साहीत्य विशेष पोलीस अधिकारी किंवा सदस्यांकडून घरपोच मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरीच थांबून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी केले आहे.

पुणे ग्रामीण जिल्हयात कोवीड -१९ संसर्गाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली व हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे-पाटील यांचे नियोजनानुसार लोणीकंद पोलीस स्टेशनकडून टीम तयार करण्यात करण्यात आली आहे. या टीममध्ये ग्रामपंचायत सदस्य, गावातील सामाजिक कार्यकर्ते व त्यांचे प्रत्येकी पाच स्वंयसेवक, ग्रामपंचायतीचे कर्मचारी व विशेष पोलीस अधिकारी असणार आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही टीम कार्यरत राहणार आहे.

पुणे जिल्हा प्रतिबंधित क्षेत्र असल्यामुळे वाघोली परिसरामध्ये कोरोनाचा होत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी लोणीकंद पोलिसांच्या वतीने वाघोलीमध्ये विशेष लक्ष दिले जात आहे. औषधी दुकाने वगळता सध्या वाघोलीतील किराणा, भाजीपाला आदि दुकाने बंद आहेत. अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नसल्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. मागील चाळीस दिवसांपासून नागरिकांनी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन केले आहे. शासनाने तिसऱ्या वेळेस १७ तारखेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी १७ तारखेपर्यंत संयम राखणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी पोलीस, डॉक्टर, सफाई कामगार, विद्युत मंडळ व अन्य घटक नागरिकांच्या सेवेमध्ये अविरत कार्यरत आहेत. कोरोना विरुद्ध लढण्याची जबाबदारी केवळ पोलीस, डॉक्टर किंवा अन्य सेवा देणाऱ्या घटकांवरच नसून प्रत्येक नागरिकाची आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लोणीकंद पोलीस स्टेशनकडून नियुक्त केलेल्या विशेष पोलीस अधिकाऱ्यांकडून किंवा सदस्यांमार्फत जीवनावश्यक साहित्य नागरिकांना घरपोच पोहचवले जाणार आहे. पोलिस-प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून नियुक्त केलेले विशेष पोलीस अधिकारी काम करणार आहेत.

" मागील चाळीस दिवसांपासून नागरिकांनी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन केले असून सतरा तारखेपर्यंत संयम राखून प्रशासनास सहकार्य करावे. अत्यावश्यक सेवांपैकी केवळ मेडिकल सुरु राहतील. किराणा, भाजीपाला, फळे आदि विशेष पोलीस अधिकारी यांच्या मार्फत घरपोच मिळतील. विनाकारण बाहेर फिरून स्वतःचे व इतरांचे आरोग्य धोक्यात घालू नये. "

– प्रताप मानकर (पोलीस निरीक्षक, लोणीकंद)