भिमाशंकर : पुणे जिल्हयातील आंबेगाव तालुका तहसिल कार्यालयातील लाचखोर अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे स्थानिक नागरिक व ग्रामस्थ त्रस्त झाल्याने या कार्यालयातील अंदागोंदी कारभाराची चौकशी करून

भिमाशंकर :  पुणे जिल्हयातील आंबेगाव तालुका तहसिल कार्यालयातील लाचखोर अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे स्थानिक नागरिक व ग्रामस्थ त्रस्त झाल्याने या कार्यालयातील अंदागोंदी कारभाराची चौकशी करून स्वच्छ प्रतिमेच्या अधिका-यांची नेमणूक होण्यासाठी शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्षनाखाली युवासेना विस्तारक सचिन बांगर यांनी लेखी निवेदनाव्दारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे. 

आंबेगाव तालुक्यातील अधिका-यांवर भ्रष्टाचाराच्या व लाचखोरीच्या प्रकरणांवर लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून धडक कारवाई करण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. वर्षभरात तहसिलदार, लिपिक व पुरवठा निरीक्षक यांच्यावर संबंधित विभागाकडून सर्वसामान्य नागरिक तक्रारी देण्यासाठी स्वतःहून पुढे आल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. आंबेगाव तहसिल कार्यालयात काही मोजके प्रामाणिक अधिकारी सोडले तर बहुसंख्य लाचखोरच आहेत. अशी नवी ओळख कार्यालयाला मिळाल्याने तालुक्यातील सर्वसामान्य जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच तहसिलदार यांचाही प्रशासनावर अंकुश राहिलेला नाही.  

आंबेगाव तालुक्यात वरीष्ठ व कनिष्ठ स्तरावरील अनेक अधिका-यांवर आजपर्यंत अनेकदा लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केली. तरी अधिकारी व कर्मचा-यांना लाच घेण्याचा मोह सुटत नाही. कार्यालयात स्वतःच्या मर्जीने परस्पर एजंटगीरी करण्यासाठी काही अधिकारी खाजगी व्यक्तींच्या नेमणूका नेमणूक पत्र न देता हंगामी कर्मचारी म्हणून कार्यालयात काम करत आहे. नेमणूक केलेल्या खाजगी व्यक्ती यांचा वापर पैसे स्विकारण्यासाठी केला जात आहे. आंबेगाव तहसिलदार कार्यालयातील सावळया गोंधळामुळे आंबेगाव तालुक्याची प्रतिमा मलिन होत असल्याने तालुक्याला स्वच्छ प्रतिमा असणारे अधिकारी मिळावेत, अशी मागणी युवा सेना विस्तारक सचिन बांगर यांनी लेखी निवेदनाव्दारे केली आहे.