कचरा डेपो बंद करा, अन्यथा १५ ऑगस्टपासून आंदोलन

– उरुळी देवाची-फुरसुंगी ग्रामस्थांचा ईशारा
पुणे : महापालिकेचा कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करा, अन्यथा १५ ऑगस्ट पासून आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा उरुळी देवाची-फुरसुंगी ग्रामस्थांनी दिला आहे.राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयाने आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला वारंवार कचरा डेपोसंदर्भात सूचना केल्या आहेत. मात्र पालिकेकडून घनकचरा हाताळणी नियम २०१६ चे पालन केले जात नाही. परिणामी कचरा डेपोच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न वारंवार ऐरणीवर येत आहे. त्यामुळे हा कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करावा, अशी मागणी कचरा डेपो संघर्ष समितीचे रणजित रासकर, गणेश ढोरे, दिलीप मेहता, विजय भाडळे, भगवान भाडळे, संजय हरपळे, तात्यासाहेब भाडळे, बाळासाहेब हरपळे यांनी केली आहे.

सदर कचरा डेपो बंद करण्यासंदर्भात झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाचे पालन महापालिकेकडून केले जात नाही. आंदोलन स्थगित केल्यानंतर वारंवार शहरातील दैनंदिन मिश्र कचरा डेपोवर ओपन डम्पिंग केला जातो. शहरतील विविध प्रक्रिया प्रकल्पातून आणि बायोमायनिंग निघणारे रिजेक्ट देखील कचरा डेपोवर ओपन डम्पिंग केले जात आहे. बायोमायनिंग प्रकल्प हा जुन्या साठलेल्या काचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी असताना, तिथे नवीन मिश्र कचरा घेतला जात आहे. शहरातील राडारोडा कचरा व रिजेक्टवर झाकून टाकण्यासाठी आणला जात आहे. तसेच नवीन प्रकल्पाला विरोध असताना प्रकल्प नागरिकांच्या माथ्यावर मारण्याचे काम केले जात आहे, असा आरोप करत ग्रामस्थांनी कचरा डेपो कायमचा बंद करण्याची मागणी केली आहे.

हा डेपो बंद न केल्यास १५ ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन करण्याचा ईशाराही दिला आहे. यासंबंधीचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांना देण्यात आले