बंद केलेले जम्बो आणि इतर कोविड सेंटर पुन्हा सुरू करणार

पिंपरी चिंचवड शहरात जवळपास एक हजार बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, चार जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांचा वाढता आकडा पाहता बंद केलेले जम्बो कोविड आणि इतर कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचा-यांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितली.

    पिंपरी : गेल्या काही दिवसांत पिंपरी-चिंचवडसह समस्त पुणे जिल्ह्यात मध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या चार दिवसांत पिंपरी चिंचवड शहरात जवळपास एक हजार बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, चार जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांचा वाढता आकडा पाहता बंद केलेले जम्बो कोविड आणि इतर कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचा-यांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितली.

    पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या १ लाख ३ हजार १९८ जण बाधित रुग्ण आहेत. त्यापैकी ९८ हजार २५७ जण ठणठणीत बरे झाले आहेत. तर, मृत्यू झालेल्यांची संख्या १ हजार ८३० इतकी आहे. दरम्यान, शहरातील बंद करण्यात आलेले जम्बो कोविड आणि इतर कोविड सेंटर टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे. आयुक्त राजेश पाटील म्हणाले, “गर्दीच्या ठिकाणी काही निर्बंध आणता येतील का यासंबंधी काही पावलं उचलली जाणार आहेत. करोना चाचण्या वाढवण्यात येणार आहेत. अगोदर दोन हजार चाचण्या होत होत्या. त्या वाढवून तीन हजार करणार आहोत.

    नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर वापरावे, तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे,” असं आवाहन त्यांनी केले आहे. आरोग्य कर्मचारी यांना कंत्राटी पद्धतीवर घेण्यात आले होते. शासनाच्या निर्देशानंतर कोविड सेंटर बंद करण्यात आले होते. कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा ते कोविड सेंटर ठराविक अंतराने सुरू करणार आहोत. आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा रुजू करण्याचा निर्णय लवकरच घेऊ. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. महानगरपालिका आणि राज्य प्रशासनाला कोविडचे सर्व नियम पाळून सहकार्य करावे. पुढील सात दिवस नागरिकांनी सहकार्य केल्यास लॉकडाऊनची परिस्थती उद्भवणार नाही”, असेही आयुक्त पाटील यांनी सांगितले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.