मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचा हात द्यावा: पाटील

इंदापूर : राज्यात मागील आठवडाभरात अनेक भागात झालेल्या अवकाळी वादळी पाऊस व गारपिटीने शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

 इंदापूर :  राज्यात  मागील आठवडाभरात अनेक भागात  झालेल्या अवकाळी वादळी पाऊस व गारपिटीने शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या शेतपिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासनाला द्यावेत व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी,अशी मागणी ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशन (इस्मा) समितीच्या सहअध्यक्षा व पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. राज्यात कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांनी पीकवलेल्या शेती मालाला भाव मिळत नाही.अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना शेतमालास बाजारपेठ व वाहतूक उपलब्ध होत नाही.त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. तर इंदापूर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या शेत पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे.

-कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
अवकाळी पावसामुळे तसेच काही भागात गारपीट झाल्याने शेतातील हरभरा, ज्वारी, गहू, कलिंगड, टरबूज, ऊस, मका ,कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासोबतच वादळी वाऱ्याने केळी, आंबा, संत्रीं  व डाळिंब या फळबागांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यांना अर्थिक मदत करावी,अशी मागणी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केलेली आहे.