मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलेल्या ‘त्या’ गावचा भांडाफोड; गावात ना फवारणी ना मास्कचे वाटप

  मोहोळ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीव्हीवरून कौतुक केलेल्या मोहोळ तालुक्यातील घाटणे गावात दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाले. गावातील काही नागरिकांनी हा केवळ स्टंट झाल्याचा आरोप सरपंचांसमोरच केल्यामुळे गोंधळ उडाला. याचा व्हिडिओही व्हायरल झाला.

  सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील सुमारे ७०० लोकसंख्या असणाऱ्या घाटणे गावात मोजकीच मंडळी राहत असून, इतर सर्व कुटुंबे कोरोना महामारीच्या भीतीने वाड्या-वस्त्यांवर राहावयास गेली आहेत. या गावात कोरोनाचे सहा रुग्ण आढळले होते. त्यापैकी पाच रुग्ण बरे झाले तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर गावचे तरुण सरपंच ऋतुराज देशमुख यांनी गाव कोरोनामुक्त केल्याचा रिपोर्ट वरपर्यंत पोहोचविला. गावात विविध, वेगवेगळे उपक्रम राबवित, गावातील सर्वांचे लसीकरण करण्यात आले आहे. सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. गावात घरोघरी सॅनिटायझरचा वापर केला असून, संपूर्ण गावात फवारणी करण्यात आली आहे. अशाप्रकारे काळजी घेऊन गाव कोरोनामुक्त केल्याचेही ऋतुराज देशमुख यांनी सांगितले होते.

  ना फवारणी ना मास्कचे वाटप

  ३० मे रोजी ऋतुराज देशमुखांच्या कामाचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी कौतुक केले. मात्र, दुसऱ्या दिवशी सर्व माध्यमं बातमी घेण्यासाठी गावात पोहोचल्यावर वेगळेच चित्र पहावयास मिळाले. गावातील काही नागरिकांनी चावडीसमोर येत थेट सरपंचांसमक्ष आरोप करण्यास सुरुवात केली. संपूर्ण गावात कुठल्याही प्रकारची अद्याप फवारणी केलेली नाही, आणलेले सॅनिटायझर ग्रामपंचायतीच्या कार्यालयातच आहे. मास्कचे वाटप केले नाही. याशिवाय लस नोंदणीसाठी ग्रामपंचायतीच्या कार्यालयांमध्ये माझ्याकडे येऊन नोंद केली तरच लस दिली जाईल, अशी भूमिका घेऊन केवळ काही लोकांचेच लसीकरण केल्याचा आरोपही काही जणांनी केला.

  निव्वळ स्टंटबाजीच

  जमावासमोर सरपंच देशमुखही उपस्थित होते. त्यांनी व्यवस्थित उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी प्रचंड गोंधळ निर्माण झाला. केवळ चुकीची अर्धवट माहिती देऊन स्टंटबाजी केल्याच्या आरोपानंतर घाटणे गाव हा चर्चेचा विषय ठरला आहे.

  सरपंचांची प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील लोकांनी भीतीपोटी आपापल्या शेतात पलायन केले. गावात केवळ १६ कुटुंबे वास्तव्यास आहेत. कोरोनाचा नायनाट करण्यासाठी गावामध्ये कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात आल्या नाहीत. सॅनिटायझेशन केले नाही ना फवारणी केली नाही. सरपंचांनी केवळ प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी केली आहे. लसीकरण करण्यामध्येही सरपंचांनी राजकारण केले आहे, असा आरोप घाटणे येथील रहिवासी गोपाळ शिराळ यांनी केला आहे.

  विरोधकांकडून विनाकारण विरोध : सरपंच देशमुख

  ”मी सरपंच झाल्यापासून गावातील पाण्याचा प्रश्न सोडवला. सध्या कोरोनाच्या काळात गावातील सर्व नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले आहे. प्रामुख्याने आम्ही गावात पंचसूत्री कार्यक्रम राबविला आहे. आशा वर्कर्सच्या माध्यमातून घरोघरी जाऊन विविध तपासण्या केल्या आहेत. तसेच ५० ते ६० टक्के लसीकरण केले आहे. कोविडच्या तपासण्या करतानाही याच लोकांनी मला विरोध केला होता. तेच लोक आताही विरोध करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी माझ्या गावाचा आणि नावाचा उल्लेख केल्यापासून विरोधक मला विनाकारण विरोध करत आहेत. माझ्याकडून काही चूक झाली असल्यास पुन्हा एकदा ती चूक सुधारून सर्वांना सोबत घेऊन गावाचा विकास करण्यासाठी एकजुटीने काम करू”, असे घाटणेचे सरपंच ऋतुराज देशमुख यांनी सांगितले.