‘नवे धोरण हाणून पाडण्यासाठी सहकारी बॅंकांना न्यायालयाची दारे ठोठवावी लागतील’ शरद पवार

नागरी सहकारी बँका व पतसंस्थांच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत, त्याबाबतच्या त्यांच्या शंका दूर केल्या. यावेळी बोलताना शरद पवार यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहांबाबत विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, सहकार खाते अमित शहांकडे आहे. माझा आणि अमित शहा यांचा संपर्क ते सहकारी बॅंकेचे संचालक असताना आला होता. अनेक वर्ष या क्षेत्रात काम केलेल्या माणसाचा दृष्टीकोन चांगलाच असेल असे मला वाटते.

    पुणे : केंद्र सरकारच्या नवीन बॅंकिंग नियमन धोरणात, भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे नेव नियम देशातील नागरी सहकारी बॅंका आणि जिल्हा बॅंकासाठी मारक आहेत. या माध्यमातून देशातील सहकार चळवळ संपविण्याचा डाव दिसत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी पुण्यात बोलताना व्यक्त केले. त्यासाठी प्रस़ंगी हे नवे धोरण हाणून पाडण्यासाठी सहकारी बॅंकांना न्यायालयाची दारे ठोठवावी लागतील. तशी तयारी ठेवा, असा ईशाराही शरद पवार यांनी दिला आहे.

    सहकारी बॅंकांसासाठी मारक ठरणारा कायदा

    राज्यातील नागरी सहकारी बॅंका आणि पतसंस्थांचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसाठी तीन दिवशीय “सकाळ सहकार महापरिषदेचे” आयोजन करण्यात आले आहे. या महापरिषदेच्या दुसऱ्या दिवशी सहकारी बॅंकांच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पवार म्हणाले,  मी केंद्रीय कृषिमंत्री असताना नागरी सहकारी आणि जिल्हा सहकारी बँकांना वरदान ठरणारी ९७ वी घटनादुरुस्ती केली. ही घटनादुरुस्ती करण्यापूर्वी सर्व राज्य व जिल्हा सहकारी बँकेची मते जाणून घेतली होती. मात्र आता केंद्र सरकारने नवे बॅंकिंग नियमन कायदा केला आहे. हा कायदा सहकारी बॅंकांसासाठी मारक ठरणारा आहे. याला सर्वांनी एकत्र येऊन विरोध केला पाहिजे. यासाठी प्रसंगी न्यायालयात जावे लागेल आणि आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिले.

    सहकार मंत्री अमित शहांबाबत विश्वास

    मार्गदर्शनानंतर शरद पवार यांनी नागरी सहकारी बँका व पतसंस्थांच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत, त्याबाबतच्या त्यांच्या शंका दूर केल्या. यावेळी बोलताना शरद पवार यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहांबाबत विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, सहकार खाते अमित शहांकडे आहे. माझा आणि अमित शहा यांचा संपर्क ते सहकारी बॅंकेचे संचालक असताना आला होता. अनेक वर्ष या क्षेत्रात काम केलेल्या माणसाचा दृष्टीकोन चांगलाच असेल असे मला वाटते. ते म्हणाले की, अमित शहा यांचे सहकारी बँका संदर्भात धोरण अनुकूल राहील असे मला वाटते. ते अहमदाबाद सहकारी बँकेचे संचालक होते आमच्यासारखे लोक अमित शहा यांच्या पाठीशी उभे राहतील त्यामुळे सहकाऱ्याला कुठलाही धोका निर्माण होणार नाही असेही मत शरद पवार यांनी व्यक्त केले.