
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज बारामतीमध्ये विविध कामांचे उद्घाटन व सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडल्या.गुरूवर्य बी.जी. घारे सर पथाचे अनावरण व बारामती तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाच्या नूतन वास्तूचे उद्घाटनही उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले.
बारामती :सहकारी संस्था समाजातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आहेत. या संस्थांच्या वाढीसाठी सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांनी प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज बारामतीमध्ये विविध कामांचे उद्घाटन व सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडल्या.गुरूवर्य बी.जी. घारे सर पथाचे अनावरण व बारामती तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाच्या नूतन वास्तूचे उद्घाटनही उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. सहयोग सहकारी गृह रचना संस्था, दि बारामती सहकारी बँक, कृषी उद्योग मूलशिक्षण संस्था, बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, बारामती तालुका दूध उत्पादक संघ, शिवनगर विद्या प्रसारक मंडळ इत्यादी सहकारी संस्थांच्या वार्षिक सभाही उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या.यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती नीता बारावकर, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, विशेष कार्य अधिकारी हनुमंत पाटील, गट विकास अधिकारी राहुल काळभोर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगरसेवक सचिन सातव, जि.प.माजी बांधकाम सभापती संभाजी होळकर तसेच सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सहकारी संस्था समाजातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आहेत. या संस्थांच्या वाढीसाठी सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांनी प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे आहे. या संस्था चालवित असताना फार नफा नको पण तोटाही झाला नाही पाहिजे. या संस्थांच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. बारामती खरेदी विक्री संघाच्या अजून काही नवीन शाखा व पेट्रोल पंप लवकरच चालू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बारामती तालुका दूध उत्पादक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रथम बारामती दूध संघाच्या प्रगती साठी ज्यांनी चांगले काम केले आहे त्यांना पुरस्कार देऊन त्यांचे अभिनंदन केले. सध्या दूध संघाचे चांगले दिवस आहेत. स्पर्धेमध्ये उतरा, नवीन नवीन प्रयोग करा, स्पर्धेमध्ये उतरायचे व टिकायचे असेल तर जाहिरात चांगली असावी, प्रॉडक्ट चांगले हवे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा, कामे दर्जेदार असावीत, संस्थेला आणि दूध उत्पादन शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याकडे लक्ष द्या, असे त्यांनी सांगितले. शेतक-यांना मदत करणारा हा व्यवसाय आहे, सर्व कर्मचा-यांनी जबाबदारीने सर्व कामे पार पाडावीत, इत्यादी सूचना करून ते म्हणाले की, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. पण नागरिकांना त्याचे गांभीर्य नाही . लोक मुक्तपणे वावरत आहेत. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग, शासनाच्या सूचनांचे पालन होतांना दिसत नाही ही गंभीर बाब आहे. सर्व नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग व शासनांच्या सूचनाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. सध्या बारामतीमध्ये देखील कोरोना रूग्णांमध्ये वाढ होतांना दिसत आहे. या करीता कोरोनाच्या टेस्टची संख्या वाढविणे आवश्यक आहे, अशा सूचना त्यांनी प्रशासनास दिल्या.