दहा दिवसांत एकूण ९४ हजार २७८ गणेशमूर्तींचे संकलन

पुणे : अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री आठ वाजेपर्यंत पुण्यात एकूण ४९ हजार ३०७ गणेश मूर्तींचे हौदांमध्ये तसेच संकलन केंद्रांवर विसर्जन करण्यात आले. गेल्या दहा दिवसांत एकूण ९४ हजार २७८ गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली.

अनंत चतुर्दशीसाठी पालिकेने नागरिकांना गणेशमूर्तींचे घरातच विसर्जन करण्याचे आवाहन केले होते.त्यानुसार गेल्या दहा दिवसांत नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद देत घरातच विसर्जन करण्यावर तसेच मूर्ती दान करण्यावर भर दिला होता. विसर्जनासाठी पालिकेने ४५ फिरत्या हौदांची व्यवस्था केली होती. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आवाहन केल्यानुसार नगरसेवकांमार्फत १६० फिरत्या हौदांची व्यवस्था करण्यात आली होती. एकुण २०५ विसर्जन रथ होते. मंगळवारी दिवसभरात या विसर्जन रथात ३१ हजार ७५७, तर, मुर्तीदान/ संकलनातून १७ हजार ४५० अशा एकजण ४९ हजार ३०७ गणेशमूर्तींचे विसर्जन पालिकेच्या यंत्रणेमार्फत झाले.
मागील वर्षी दहा दिवसांत ५ लाख २६ हजार ८७५ गणेशमुर्तींचे विसर्जन झाले होते. यंदा पहिल्या दिवसापासून ५७ हजार ६०० व मुर्ती दान/ संकलनामधून ४१भजार ६७८ अशा एकुण ९४ हजार २७८ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले आहे. यामध्ये रात्री बारा वाजेपर्यंत वाढ होऊ शकेल. पुणेकरांनी महापौर आणि पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत घरातच विसर्जन करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून आले. पालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालय स्तरावर नियोजन करण्यात आले होते. सर्व विभागीय कार्यालयांचे उप आयुक्त, सर्व सहायक आयुक्त यांनी संयोजन, नियोजन केले होते.

महापौर आणि पालिका प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही काही नागरिकांनी कालव्यात आणि नदीपात्रात गणेशमूर्तींचे विसर्जन केल्याचे पहायला मिळाले. निर्माल्य गोळा करण्याची यंत्रणा असतानाही नागरिकांनी रस्त्यावर निर्माल्य फेकल्याचे चित्रही शहरात पहायला मिळाले.