दिलासादायक! पुणे शहरात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा पाचशेच्या आत ; ८८७ जणांची कोरोनावर मात

शहरातील गंभीर रूग्ण संख्या ९५४ , ३७ रुग्णांनी गमावला जीव

    पुणे: शहरात रविवारी कोरोनाबाधितांची वाढ ही पुन्हा एकदा पाचशेच्या आत आली असून, आज दिवसभरात केवळ ४८६ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. दरम्यान महापालिकेसह खाजगी प्रयोगशाळांमधील तपासण्यांचे प्रमाणही दिवसागणिक कमी होऊ लागले असून, आज झालेल्या ७ हजार ४२३ तपासण्यांमध्ये एकूण पॉझिटिव्ह रूग्णांची टक्केवारीही ६.५४ टक्के इतकी खाली आली आहे़

    शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ६ हजार ६१५ असून, रविवारी ८८७ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़. दिवसभरात ३७ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ९ जण हे पुण्याबाहेरील आहे़ शहरातील आजचा मृत्यू दर हा १.७५ टक्के इतका आहे़.

    पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये १ हजार ६२३ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू असून, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही ९५४ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २४ लाख ९२ हजार २९८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ६९ हजार ७४७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ५४ हजार ९०० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत शहरात ८ हजार २३२ जणांचा मृत्यू झाला आहे.