वाढीव बिलाच्या तक्रारी वाढल्या ; पुणे शहरातील १७२ रुग्णालयांना नोटिस

काेराेनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासंदर्भात राज्य सरकारने नियमावली आणि दर ठरविले आहे. राज्य सरकारच्या नियमानुसारच दराची आकारणी करण्याचे बंधन आहे. त्यानंतरही अनेक रुग्णालयांकडून वाढीव बिले दिली जात आहे. उपचारापोटी खासगी रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

    पुणे : काेराेनाबाधित रुग्णांवर उपचाराची वाढीव बिले रुग्णालयांकडून दिली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहे. अशा प्रकारच्या २२२ तक्रारी महापालिकेकडे दाखल झाल्या असून, १७२ रुग्णालयांना नाेटीस दिली गेली आहे.

    काेराेनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासंदर्भात राज्य सरकारने नियमावली आणि दर ठरविले आहे. राज्य सरकारच्या नियमानुसारच दराची आकारणी करण्याचे बंधन आहे. त्यानंतरही अनेक रुग्णालयांकडून वाढीव बिले दिली जात आहे. उपचारापोटी खासगी रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. वाढीव बीलाच्या तक्रारींचे निराकरण आणि शहानिशा करण्यासाठी महापालिकेने प्रत्येक रुग्णालयात ऑडीटरची नियुक्ती केली आहे. फेब्रुवारी महीन्यात काेराेनाची दुसरी लाट सुरू झाली, या कालावधीत वाढीव बिलाच्या सुमारे २२२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारींच्या आधारे महापालिकेने १७२ रुग्णालयांना नाेटीस बजाविल्या आहेत. दाखल तक्रारींपैकी ९० निकाली काढण्यात आले, २७ तक्रारींमधील बिलांचे लेखा परीक्षण करून वाढीव स्वरुपात घेण्यात आलेले २० लाख रुपये संबंधितांना परत दिली गेले आहेत. काही प्रकरणांत तक्रारदारांशी संपर्क हाेऊ शकत नाही, तर काही तक्रारीत तथ्य नसल्याचे आढळले आहे.

    या नंबरवर करा तक्रार
    कोविडच्या साधारण बेडसाठी प्रतिदिन ४ हजार, ऑक्सिजन बेडसाठी साडेसात हजार आणि व्हॅटीलेटर बेडसाठी ९ हजार अशी बिल आकारण्याची मर्यादा राज्य शासनाने खासगी रुग्णालयांना ठरवून दिलेली आहे. यापेक्षा दरदिवशी जास्त बिल आकारल्यास रुग्णांनी पालिकेच्या ०२०- २५५०२११५ या क्रमांकावरही तक्रार करावी.