स्मार्ट सिटीची कामे मार्च २२ पर्यंतपूर्ण करा; केंद्राची पिंपरी चिंचवड महानगर पालिकेला सूचना

महापालिकेचा एकही प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही.अनेक प्रकल्प रखडले आहेत. केंद्राचे प्रकल्प बाजूला सारुन स्थानिक प्रकल्पांना प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र आहे.त्यामुळे केंद्राचे प्रकल्प प्रलंबित आहेत. स्मार्ट सिटी अभियानाचे कुणालकुमार यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या कामांचा आढावा घेतला

    पिंपरी: स्मार्ट सिटी अभियानात निश्चित केलेले प्रकल्प आणि कामे मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्यावर भर द्यावा. ही कामे मुदतीत पूर्ण करा. कोणत्याही कामांना मुदतवाढ दिली जाणार नाही. तसेच, केंद्रशासनाकडून निधी उपलब्ध होणार नाही, अशा सूचना पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीला केंद्र शासनाकडून देण्यात आल्या आहेत. यामुळे येत्या ९ महिन्यात विविध प्रकल्प पूर्ण करण्यावर महापालिकेस भर द्यावा लागणार आहे.

    स्मार्ट सिटी अभियानाचे सहसचिव कुणालकुमार यांनी राज्यातील स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून नुकतीच बैठक घेतली. या बैठकीस पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त राजेश पाटील उपस्थित होते. स्मार्ट सिटीच्या प्रकल्पास केंद्र तसेच, राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते.हा निधी प्रकल्पाचे काम सुरु झाल्यानुसार टप्पाटप्पाने प्राप्त होतो. स्मार्ट सिटी योजना सुरु करताना केंद्र शासनाने काही निकष ठरवून दिले होते.त्या निकषामध्ये निधी खर्च करावा, असे सूचित करण्यात आले होते.प्रत्येक शहराच्या गरजा आणि परिस्थिती भिन्न आहे.
    प्रकल्प आराखडे तयार करताना , त्यांची अंमलबजावणी करताना महापालिकेस अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.काही प्रकल्प रद्य करुन घेण्यात आले.त्यामुळे महापालिकेचा एकही प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही.अनेक प्रकल्प रखडले आहेत. केंद्राचे प्रकल्प बाजूला सारुन स्थानिक प्रकल्पांना प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र आहे.त्यामुळे केंद्राचे प्रकल्प प्रलंबित आहेत. स्मार्ट सिटी अभियानाचे कुणालकुमार यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या कामांचा आढावा घेतला. मार्च २०२२ पर्यंत सर्व प्रकल्प मार्गी लावावेत.त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केल्याचेपिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण यांनी सांगितले.