सांडपाण्याचा निचऱ्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची वैशाली दाभाडे यांची  मागणी

तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे येथील हिंदमाता भुयारी मार्गाच्या सांडपाण्याच्या निचाऱ्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या मागणीचे निवेदन उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांना दिले.

तळेगाव दाभाडे:  तळेगाव दाभाडे येथील हिंदमाता भुयारी मार्गाच्या सांडपाण्याच्या निचाऱ्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या मागणीचे निवेदन उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांना दिले. तळेगाव दाभाडे स्टेशन चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी गाव भागाला जवळचा मार्ग म्हणून हिंदमाता भुयारी पूल बांधण्यात आला. त्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. व वाहतुकीला खुला करण्यात आला. २०१९ च्या पावसाळ्यात वारंवार त्या पुलाच्या रस्त्यावर पाणी साठल्याने या पुलाचा अनेकदा स्विमिंग पूल होऊन पूल वाहतुकीसाठी वापरता आला नाही.
मागील वर्षी या पुलाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने पावसाळ्यात त्याच्या बाजूच्या लक्षद्वीप सोसायटीमध्ये काही रहिवाश्यांच्या घरात पाणी घुसल्याने सीमा भिंती तोडाव्या लागल्या, त्यांचे आर्थिक नुकसान झाले व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. नागरिकांनी वारंवार मागणी करूनही या पुलाखाली पावसाचे पाणी साठते आहे. दुरुस्ती अभावी हा पूल फायद्याचा असताना देखील अडगळीचा ठरला आहे. पावसाळ्यात हा पूल वाहतुकीसाठी वापरता येत नाही. पावसाळ्याच्या अगोदरच पुलाच्या खालील पाण्याचा निचरा होण्यासाठी त्वरित काम पूर्ण करण्याची मागणी लेखी निवेदनाव्दारे उपनगराध्यक्षा दाभाडे यांनी केली आहे.