पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्या ‘या’ सूचना

    पिंपरी : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाई तसेच इतर सर्व कामांना गती देऊन नियोजनबध्द पध्दतीने काम वेळेत पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी प्रशासनाला दिले. यासाठी सातत्याने स्थळ पाहणी करुन पावसाच्या पाण्याचा त्वरीत निचरा होईल आणि रस्ते जलमय होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी असेही आयुक्त पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशित केले.

    पावसाळ्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीचा विचार करुन महापालिकेने नियोजन केले असून, विभागवार कामकाजाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. सर्व कामे गतीने आणि समन्वयाने वेळेत पार पाडावीत यासाठी स्वतंत्रपणे आदेश जारी केला आहे. पावसाळ्यातील प्राधान्याने करावयाच्या कामासाठी सर्वेक्षण करुन कालबध्द कार्यक्रमाची आखणी करुन सर्व साफसफाई वेळेत होईल याची काळजी घ्यावी. सफाईनंतर काढलेल्या कचऱ्याची तात्काळ विल्हेवाट लावावी. जुने कपडे, गाद्या, प्लास्टिक पिशव्या, झाडांच्या फांद्या, भंगार माल, कचराकुंडीत तसेच रस्त्याच्या कडेला पडलेला असतो, त्यामुळे योग्य पध्दतीने घनकचरा व्यवस्थापनाचे नियोजन करण्याच्या सूचना आयुक्त पाटील यांनी संबंधितांना दिल्या.

    पाण्याच्या प्रवाहास अडथळा ठरणाऱ्या सेवा वाहिन्या स्थलांतरीत करण्यासाठी त्या ठिकाणची पाहणी करुन कालबध्द कार्यक्रम हाती घ्यावा. नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरणार नाही यासाठी त्या भागाची पाहणी करुन तात्काळ उपाययोजना करावी, आदी सूचना आयुक्त पाटील यांनी दिल्या आहेत.

    विभागांतर्गत समन्वय ठेवून शहरातील मुख्य नाले, ओढे, बंदीस्त नाले, उपनाले, सी.डी. वर्कस, पाईप कलव्हर्टस, गटारे यांची साफसफाईची कामे पूर्ण करावीत. शहरातील साठलेला कचरा त्वरीत उचलावा. सर्व झोपडपट्यांमधील गटारे, नाले स्वच्छ आणि अतिक्रमणमुक्त राहतील याची दक्षता घ्यावी. प्रत्येक पावसानंतर याठिकाणाची पाहणी करुन त्याची तात्काळ स्वच्छता करण्यात यावी.

    पावसाळ्याच्या काळात जलनि:सारण वाहिन्या चोकअप काढणे यासाठी स्वतंत्र पथक तयार ठेवावे. स्टॉर्म वॉटर चेंबर्स, जलनि:सारण सर्व मॅनहोल्स यावर योग्य क्षमतेचे झाकण असल्याची खातरजमा करावी. शहरातील जी ठिकाणे जलमय होतात त्या ठिकाणांकडे विशेष लक्ष द्यावे, असे आदेशात नमूद केले आहे.