पुन्हा एकदा पहाटेचा शपथविधी? भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी दिले हे संकेत, वाढवला संशयकल्लोळ

अमित शाह यांना भेटण्याची वेळ रात्रीचीच असते. ती निवांत भेट असेल. पण शरद पवार अहमदाबादला जाऊन अमित शाह यांना निवांतपणे का भेटले, याचा विचार झाला पाहिजे. परंतु, नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

    पुणे दि. २९: भाजप आणि राष्ट्रवादीचे काही ठरलेच तर मागच्यावेळी शपथविधी झाल्यावर जसे कळले तसेच यावेळीही कळेल, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजकीय संभ्रम वाढविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांना गुप्तपणे भेटल्याच्या वृत्तावर भाजपच्या नेत्यांनी संशयात भर घालणारी वक्तव्ये करण्यास सुरूवात केली आहे.

    अशा भेटी झाल्या पाहिजेत

    कार्यकर्त्यांमध्ये भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत, अशी चर्चा सुरू असल्याबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर पाटील यांनी सूचक विधान केले. शरद पवार आणि अमित शाह यांची २६ मार्चला अहमदाबादमध्ये भेट झाल्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ता नबाब मलिक यांनी इन्कार करत खुलासा केल्याबाबत विचारणा केली असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, राजकारणात अशा भेटी झाल्या पाहिजेत, राजकारण हे राजकारणाच्या जागी असते. मात्र, नेत्यांनी एकमेकांना भेटले पाहिजे.

    अलीकडच्या काळात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून अशा भेटीगाठी कमी झाल्या होत्या. अमित शाह आणि शरद पवार यांची भेट राजकीय कारणासाठीच होती, असे नाही. त्यामागे एखादे समाजोपयोगी कारणही असू शकते, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

    मला नक्की माहिती नाही

    असे असले तरी पवार आणि शाह यांच्यात नक्की भेट झाली का, हे मला माहिती नाही. पण अमित शाह यांनी केलेली वक्तव्य पाहता ही भेट झाली असावी, असा खुलासाही करायला ते विसरले नाहीत. महाविकास आघाडी सरकारला धोका नाही, असे काही नेते सांगत आहेत. त्यामुळे सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नाही, हेच सिद्ध होत असल्याचा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

    मोदी – शाह घेतील तो निर्णय मान्य

    यावेळी खुलासा करताना पाटील म्हणाले की, अमित शाह रात्रीच्यावेळी शरद पवार यांना भेटल्याचे समजते. अमित शाह यांना भेटण्याची वेळ रात्रीचीच असते. ती निवांत भेट असेल. पण शरद पवार अहमदाबादला जाऊन अमित शाह यांना निवांतपणे का भेटले, याचा विचार झाला पाहिजे. परंतु, नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.