शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता कर्तव्य भावनेतून दिलेले योगदान महत्त्वाचे : आमदार राम सातपुते

  जेजुरी : कोरोना काळात लोकांचा जीव वाचवण्यासाठी सामाजिक संस्थांनी दिलेले योगदान गौरवास्पद आहे. केवळ शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता कर्तव्य भावनेतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे, असे विचार आमदार राम सातपुते यांनी एखतपूर (ता. पुरंदर) येथे व्यक्त केले.

  भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस ॲड. श्रीकांत ताम्हाणे यांनी आयोजित केलेल्या सामाजिक संस्थांच्या गौरव समारंभात ते बोलत होते. आमदार जयकुमार गोरे, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, युवा मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष नगरसेवक किरण दगडे, किसान मोर्चाचे गणेश आखाडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संपर्कप्रमुख सुनील देशपांडे, निलेश जगताप आदी उपस्थित होते.

  संस्था व आशा वर्कर यांचा सन्मान

  पुरंदर तालुक्यात  करोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व आशा वर्कर यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. यामध्ये ग्रामीण संस्था पुरंदर, जेजुरी आरोग्य सेवा संघ, ऋणानुबंध फाउंडेशन, चिंतामणी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भास्कर आत्राम, सासवड ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. किरण राऊत यांचा सन्मान करण्यात आला. बेलसर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या २७ आशा सेविकांनाही गौरविण्यात आले.

  १०७ रुग्णांना सहा महिने मोफत औषध वाटप

  श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबा मंदिर लॉकडाउन काळात बंद झाल्याने येथील अर्थव्यवस्था कोलमडली होती. वाघ्या-मुरळी, गोंधळी, मंदिरावर अवलंबुन असणारे छोटे व्यवसायिक यांचे व्यवसाय बंद  झाले. मधुमेह, रक्तदाब, दमा या आजारावर नियमित घ्यावी लागणारे औषधे विकत घेण्यासाठी पैसे नसल्याने अनेकांनी औषधे घेणे बंद केले होते. ही अडचण ओळखून जेजुरी आरोग्य सेवा संघाचे डॉ. नितीन केंजळे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश खाडे, डॉ. शमा केंजळे, राजेश शेरे यांनी लोकसहभागातून १०७ रुग्णांना साडेतीन लाख रुपयांची ६ महिने मोफत औषधे दिली. याशिवाय जीवनावश्यक साहित्य भेट दिले.