कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या महापालिकेतील ११५६ डॉक्टरांना कोरोना भत्ता

  पिंपरी : कोरोना संकटकाळात वायसीएम रूग्णालयासह महापालिका रूग्णालय, दवाखान्यांमध्ये मानधनावर कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्वतंत्र कोरोना भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच धर्तीवर आता महापालिका आस्थापनेवर कार्यरत असलेल्या वैद्यकीय तांत्रिक संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही कोरोना भत्ता मिळणार आहे. महापालिकेतील १ हजार १५६ कर्मचाऱ्यांचा लाभ मिळणार आहे. १ एप्रिल २०२१ ते ३० जून २०२१ या कालावधीकरिता या भत्त्यापोटी तीन कोटी खर्च होणार आहे.

  पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव सुरू झाल्यानंतर १४ मार्च २०२० ते १७ मे २०२० आणि १४ जुलै २०२० ते २३ जुलै २०२० या कालावधीत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. या ६५ दिवसांच्या लॉकडाऊन कालावधीत महापालिका विविध विभागातील कर्मचारी, मानधनावरील, ठेकेदारांकडे काम करत असलेले कर्मचारी, प्रशिक्षणार्थी तसेच भांडार विभाग आणि इतर विभागातील कर्मचारी प्रत्यक्ष कोरोना विषयक कामकाज करत होते. या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या कामाच्या प्रमाणात हजर दिवसाप्रमाणे प्रतिदिन १५० रूपये प्रोत्साहन भत्ता मंजूर करण्यात आला होता.

  शहरात फेब्रुवारी २०२१ पासून पुन्हा कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू झाला. या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिकेमार्फत युद्धपातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे कोरोना संकटकाळात कामकाज करणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयासह महापालिका रूग्णालय, दवाखाने येथील कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांना स्वतंत्र कोरोना भत्ता देण्याबाबत वैद्यकीय मुख्य कार्यालयामार्फत १९ मे २०२१ रोजी महापालिका आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

  त्यानुसार, वायसीएम रूग्णालय तसेच महापालिकेची इतर रूग्णालये व दवाखाने या ठिकाणी कोरोना संकटकाळात मानधनावर कार्यरत असलेल्या तज्ञ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, दंतशल्य चिकीत्सक यांना १५ हजार रूपये, स्टाफनर्स व सर्व परॉमेडीकल स्टाफ यांना १० हजार रूपये, प्रयोगशाळा सहायक आणि वर्ग चारमधील कर्मचारी यांना पाच हजार रूपये याप्रमाणे मासिक वेतना व्यतिरिक्त स्वतंत्र कोरोना भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला.

  हा भत्ता १ एप्रिल २०२१ पासून ३० जून २०२१ अखेर दरमहा देण्यात येणार आहे. १२ मे २०२१ रोजीच्या स्थायी समिती सभेत या ठरावास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भातील कार्यवाही वैद्यकीय विभागाकडून करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर महापालिकेच्या वायसीएम रूग्णालय तसेच महापालिकेची इतर रूग्णालये व दवाखाने या ठिकाणी कोरोना संकटकाळात आस्थापनेवर कार्यरत असलेले वैद्यकीय तांत्रिक संवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांनाही कोरोना भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  त्यानुसार, महापालिका आस्थापनेवरील वर्ग एक ते चार संवर्गातील १ हजार १५६ अधिकारी, कर्मचाऱ्यांना या भत्त्याचा लाभ मिळणार आहे. १ एप्रिल २०२१ ते ३० जून २०२१ या कालावधीकरिता त्यांना १ कोटी ४ लाख रूपये प्रति महिना भत्ता दिला जाणार आहे. या विषयाला बुधवारी (दि. २३) झालेल्या स्थायी समिती सभेत आयत्या वेळी मंजुरी देण्यात आली.