कोरोनाने जवळच्या नातेवाइकांपासूनही केले दूर ; संसर्गाच्या भीतीमुळे सांत्वन करणे अवघड

कोरोनाची दुसरी लाट तीव्र असून, यामुळे मृत्युदर वाढला आहे. वृद्ध आणि ज्येष्ठांबरोबर तरुणही बळी पडत आहेत. वृद्धापकाळाने, काहींचा अल्प, तसेच दीर्घ आजाराने, तर काहींचा कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. या कुटुंबीयांचे दु:ख हलके करण्यासाठी तसेच त्यांच्या दु:खात सहभागी होण्यासाठी अंत्यसंस्कार, रक्षा विसर्जन, दशक्रिया अशा कोणत्याच विधीला उपस्थित राहण्यास मर्यादा पडत आहेत. इच्छा आणि ओढ असूनही केवळ कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून येण्या - जाण्यास प्रतिबंध घातला जात आहे.

    पिंपरी : कोरोनामुळे अनेकांना जवळच्या नातेवाइकांपासूनही दूर केल्याचे कटू व परंतु वास्तव घटना समोर येऊ लागल्या आहेत. आपल्याला लागण होईल की काय भीतीने अनेकजण मृत झालेल्या नातेवाइकांपासून दूर राहात असल्याच्या घटना पाहून मन सुन्न झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. कोरोना महामारीत अनेकांच्या निधनाच्या बातम्या कळत असल्या तरी संसर्गाच्या भीतीमुळे त्या कुटुंबीयांचे सांत्वन करणे अवघड झाले आहे. ज्यांच्या घरी अशी दुःखद घटना घडते, त्यांनाच जड अंतःकरणाने ‘नका येऊ कुणी दारावर’ असा संदेश द्यावा लागत आहे. सुखात नाही तर नाही, पण दु:खातही हा कोरोना आड येत असल्याने नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवाराची घुसमट होत असल्याचे चित्र आहे.

    कोरोनाची दुसरी लाट तीव्र असून, यामुळे मृत्युदर वाढला आहे. वृद्ध आणि ज्येष्ठांबरोबर तरुणही बळी पडत आहेत. वृद्धापकाळाने, काहींचा अल्प, तसेच दीर्घ आजाराने, तर काहींचा कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. या कुटुंबीयांचे दु:ख हलके करण्यासाठी तसेच त्यांच्या दु:खात सहभागी होण्यासाठी अंत्यसंस्कार, रक्षा विसर्जन, दशक्रिया अशा कोणत्याच विधीला उपस्थित राहण्यास मर्यादा पडत आहेत. इच्छा आणि ओढ असूनही केवळ कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून येण्या – जाण्यास प्रतिबंध घातला जात आहे.

    कोरोनाची बाधा होऊ नये, तसेच कोरोनाचा वाहक वा माध्यम बनू नये या उद्देशाने कुणीही सांत्वनाला येऊ नये, असे संदेश सोशल मीडियावर टाकले जात आहेत. कोरोनाच्या अनामिक भीतीमुळे हे दु:ख असेच एकेकटे पचविण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षीपर्यंत सुखदु:खाला तरी एकमेकांच्या दारी जाणे व्हायचे. दु:खात मित्रमंडळी, नातेवाइकांचा अशा वेळी मोठाच आधार मिळायचा. दु:ख स्वत:लाच सहन करावे लागत असले तरी शेजारपाजारचे लोक, नातेवाईक, स्नेहीजन काही दिवस तरी बरोबर असत. आता इच्छा असली तरी जवळचे नातेवाईकही येऊ शकत नाहीत. कोरोनाने जीवांबरोबरच मानवी नात्यांवरही हल्ला केल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. हिंदू धर्मात अंत्यसंस्कारानंतर तेराव्याला तेरा जणांना जेऊ घालण्याची प्रथा आहे. परंतु सध्याची परिस्थिती बघता तेराव्यासाठी सोडाच त्यानंतर दर महिन्यासाठीही लागणारा एक उपवासकरू मिळणे दुरापास्त झाले आहे. अनेकांनी या विधींकडे पाठ फिरविल्याने यापुढे दहावे अन् तेरावेही होतील की नाही ? अशी परिस्थिती ओढावली आहे. दूरचे नातेवाईक सोडा, जवळचे सख्खे सोयरेही या विधींपासून दूर पळत असल्याचे विदारक परंतु वास्तव चित्र यानिमित्ताने समोर आले आहे.

    कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून अंत्यविधी आणि विवाह सोहळे मोजक्याच नातेवाइकांच्या उपस्थित पार पाडण्याचे आदेश असल्यामुळे विवाह सोहळ्यास ऑनलाईन उपस्थिती व आशीर्वाद देण्यात येत आहे. तसेच अंत्यसंस्काराला उपस्थित राहू न शकनारे नातेवाईक, मित्र ऑनलाईनच अंत्यदर्शन घेत आहेत. आपल्या जवळच्या नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यास व अंत्यविधीला उपस्थित न राहता येण्याचे दु:ख असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व विधी ऑनलाईन पहावा लागत आहे.कोरोनामुळे सारे जगच बदलून जाण्याचा मार्गावर आहे. जसे आर्थिक, मानसिक, सामाजिक परिणाम कोरोनामुळे झाले तसेच जुन्या प्रथा, परंपरा सोडून द्याव्या लागत आहेत. थाटामाटात व भव्य दिव्य होणारे विवाह सोहळे कोणताही वाजागाजा न करता पाच पंचवीस वNहाडी मंडळीच्या उपस्थितीत पार पाडावा लागत आहे. हीच परिस्थिती अंत्यविधी, विविध सोहळ्याची आहे. राज्यात ‘ब्रेक द चेन’ असल्यामुळे प्रवासी वाहतूकीला मर्यादा आल्या आहेत. तसेच विवाह सोहळा आणि अंत्यविधी मोजक्याच उपस्थितीत संपन्न करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे जे नातेवाईक, मित्र परिवार उपस्थित राहू शकत नाहीत अशांना ऑनलाईन उपस्थित लावून आशीर्वाद व शुभेच्छा द्याव्या लागत आहेत. आपल्या नातेवाईकांना, मित्राला शेवटचा निरोप देण्यासाठी अंत्यसंस्काराला आवर्जून उपस्थित राहतो. पण कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर हे सुध्दा बंद झाले आहे. ऑनलाईन अंत्यदर्शन घेवून श्रध्दांजली अर्पण करावी लागत आहे. कोरोना संसर्गजन्य असल्यामुळे गर्दीमध्ये जाणे टाळणे आवश्यक आहे. अंत्यसंस्कार व विवाह सोहळ्यातून जास्त प्रसार होण्याची शक्यता आहे. अशा घटना यापुर्वीही झाल्या आहेत. त्यामुळे ऑनलाईन हा एक चांगला पर्याय असून सुरक्षित आहे. तसेच गर्दीवर नियंत्रण करता येते, अशी प्रतिक्रीया नागरिक देत आहेत.