कोरोनामुळे शहरातील ८७ बालके झाली पोरकी ; छत्र हरपलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी टास्क फोर्स

-शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण सुरू

    पिंपरी : कोरोनामुळे अनेक कुटुंबातील आई – वडिलांचे छत्र हरपले आहे. संसर्ग होऊन कोणाचे बाबा ; तर कोणाची आई हिरावली आहे. ज्यांचे आई किंवा वडील कोरोनामुळे मृत्यू पावले, अशी ८७ बालके पोरकी झाली आहेत ; तर एका चिमुकल्याचे आई आणि वडीलही राहिले नसून त्याच्या वाटेला अनाथपण आले आहे.

    कोरोनाच्या विळख्यात अनेक कुटुंबे सापडली आहेत, यात कर्ती माणसे जग सोडून गेली. या बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ही बालके शोषणास बळी पडण्याची तसेच बालकामगार, बालभिक्षेकरी किंवा मानवी तस्करीत सापडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने देखील टास्क फोर्स गठित करण्याचे निर्देश दिले होते. अशा छत्र हरपलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी महापालिकेने बाल संगोपन योजनेंतर्गत १८ मे रोजी टास्क फोर्स स्थापन केली. या टास्क फोर्सच्यावतीने कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वयानुसार शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण सुरू आहे.

    आई व वडील नाहीत, अशा एका मुलाचा शोध शहरात लागला आहे. दोन्ही पालकांचा मृत्यू झालेल्या बालकांच्या मदतीसाठी महापालिकेच्या ८८८८००६६६६ हा चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक असून, त्यावर माहिती देण्याचे आवाहन केले आहे. पालकांच्या मुलांची माहिती घेण्याबरोबरच त्या बालकांची देखील माहिती संकलित केली जात आहे. ज्यांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे. याची माहिती देखील शासनस्तरावर पाठविण्यात येत आहे. मंगळवार दुपारपर्यंत आलेल्या माहितीनुसार ८७ बालके अनाथ झाली असून, एका बालकांचे आई – वडील कोरोनाने हिरावले आहेत, अशी माहिती कृती दलाच्या त्रिसदस्यीय समितीने दिली.

    अनाथ झालेल्या बालकांना परस्पर कोणीही दत्तक घेऊ नये किंवा कोणीही देऊ नये. अशा मुलांची माहिती देण्यासाठी टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करावा. यासाठी महापालिकेच्या ८८८८००६६६६ हा चाइल्ड हेल्पलाईनवर संपर्क साधावा.

    - उल्हास जगताप , अतिरिक्त आयुक्त, पिंपरी - चिंचवड महापालिका