कोरोनाची भीती कमी अन् आता डेंग्यू, मलेरियाचा वाढतोय धोका!

  पिंपरी : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे, तर दुसरीकडे पावसाळ्याला सुरुवात झाल्याने डेंग्यू, मलेरियाचा धोका वाढला आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरियाचा फैलाव रोखण्यासाठी वेळीच आवश्यक ती खबरदारी घेऊन डासांच्या उत्पत्तीला ब्रेक लावण्याची गरज आहे. यासाठी आरोग्य विभागाला अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत.

  कोरोनाच्या संकटातून पिंपरी – चिंचवडकरांची आता काही प्रमाणात सुटका होऊ लागली आहे. अशातच डेंग्यू, मलेरियाचे दुसरे संकट समोर येऊन ठेपले आहे. पावसाळ्याला सुरुवात झाली असून मान्सून पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू, मलेरियाचा धोका वाढला आहे. डेंग्यू, मलेरियाची साथ सुरू होण्यापूर्वीच ती रोखण्याचे मोठे आव्हान आहे. मागील पाच वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास मलेरिया मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे, मात्र डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या नेहमीच कायम आहे.

  महापालिका प्रशासनाने आगामी काळात कोरोनाच्या तिसNया लाटेचे संकेत दिले आहेत, अशा परिस्थितीत डेंग्यू, मलेरियाची साथ परवडणारी नाही. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी स्वच्छतेकडे लक्ष देऊन वेळीच सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. घरातील पाण्याची भांडी नियमित धुणे, कुठेही पाणी साचू न देणे ही काळजी प्रामुख्याने घेण्याची गरज आहे.

  ही घ्या काळजी…

  आपल्या घराभोवती अथवा परिसरात पाणी साचू न देणे, साचलेली डबकी वाहती करणे किवा बुजवणे, घराच्या खिडक्यांना डासविरोधी जाळ्या बसविणे, छतावरील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण लावणे, पाण्याची भांडी झाकून ठेवणे, घरगुती पाण्याचे साठे आठवड्यातून किमान एकदा रिकामे करून घासून, पुसून, स्वच्छ करून कोरडा दिवस पाळणे, टायर, फुटके कॅन, डबे यांची योग्य रीतीने विल्हेवाट लावून त्यात पाणी साठणार नाही याची काळजी घेणे. झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे, पूर्ण बाह्यांचे कपडे घालणे, संडासच्या व्हेंट पाइपला जाळी बसविणे, कायस्वरूपी डासोत्पत्ती स्थानामध्ये गप्पी मासे सोडणे. तसेच आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे.
  ————————
  आजार संशयित पॉझिटीव्ह
  ———————————————-
  डेंग्यू (२०१९) ४०१२ २८०
  ———————————————-
  डेंग्यू (२०२०) ६५० १५
  ———————————————–
  डेंग्यू जानेवारी (२०२१) ३७ ००
  ———————————————–
  मलेरिया (२०१९) ८९४९४ १०
  ———————————————-
  मलेरिया (२०२०) २७३७० ४
  ———————————————–
  मलेरिया जानेवारी (२०२१) १८३६ ४
  ———————————————–
  चिकुनगुणिया (२०१९) ८ ००
  ———————————————-
  चिकुनगुणिया (२०२०) २७२ ००
  ———————————————–
  चिकुनगुणिया जानेवारी (२०२१) २२ ००