पिंपरी चिंचवडमधील एकाच सोसायटीतील ३२ रहिवासी कोरोना पॉझिटीव्ह

मीरचंदानी पाम्स गृहनिर्माण सोसायटीत कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. ३२ रुग्ण एकाच दिवशी पॉझिटीव्ह आलेले नाहीत. २१ ते २७ ऑगस्ट दरम्यान ३२ जण पॉझिटीव्ह आले आहेत. हौसिंग सोसायटी सील केली असून कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे.

    पिंपरी: कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटे धोका वैद्यकीय तज्ज्ञाकडून सातत्याने व्यक्त केला जात आहे. अशातच रहाटणी – कोकणे चौकातील मीरचंदानी पाम्स या गृहनिर्माण सोसायटीतील ३२ रहिवासी कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. २१ ते२७ऑगस्टदरम्यान हे रुग्ण आढळले असून त्यात वयोवृद्ध, लहान मुलांचा समावेश आहे. या हौसिंग सोसायटीतील सर्व रहिवाशांची चाचणी केली जाणार असून त्यासाठी शिबीर भरविले जाणार आहे. हौसिंग सोसायटी ‘सील’ करण्यात आली आहे.

    पिंपळे सौदागर – रहाटणी कोकणे चौक येथील रामबाग कॉलनीत मीरचंदानी पाम्स ही मोठी गृहनिर्माण सोसायटी आहे. २०० हून अधिक सदनिका आहेत. २१ ऑगस्टरोजी या सोसायटीमधील ३, २२ ऑगस्टला २, २३ ला ४, २४ रोजी २, २५ ला २, २६ रोजी ६ आणि २७ ऑगस्टला १३ जण पॉझिटीव्ह आले आहेत. महापालिका प्रशासनाकडून सर्व रहिवाशांची कोरोना अँटीजेन चाचणी केली जात आहे. एकाच हौसिंग सोसायटीत एवढे रूग्ण सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    महापालिकेचे सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, रहाटणी कोकणे चौक येथील मीरचंदानी पाम्स गृहनिर्माण सोसायटीत कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. ३२ रुग्ण एकाच दिवशी पॉझिटीव्ह आलेले नाहीत. २१ ते २७ ऑगस्ट दरम्यान ३२ जण पॉझिटीव्ह आले आहेत. हौसिंग सोसायटी सील केली असून कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले आहे. सर्वांची चाचणी केली जात आहे. सर्वांना क्वारंटाईन केले आहे. वैद्यकीय विभाग लक्ष ठेवून आहे.