Corona-Virus

चोवीस तासात आढळले ६४३ नवीन रुग्ण : १,२७० रुग्णांना डिस्चार्ज ; ३७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे  : कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याच्या सात महिन्यांनंतर शहरातील रुग्णसंख्या दीड लाखांवर पोहोचली आहे. परंतू मागील दोन महिन्यांत सर्वोच्चस्थानी पोहोचलेला रुग्णसंख्येचा दर मागील आठवड्यापासून कमी झालेला दिसून येत आहे, ही दिलासादायक बाब आहे. आज शहरामध्ये ६४३ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले असून दिवसभरात १ हजार २७० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर येथे उपचार घेणार्‍या महापालिका हद्दीबाहेरील ७ जणांसह ३७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

शहरातील रुग्णसंख्या १ लाख ५० हजार ४३३ झाली असून त्यापैकी १ लाख ३२ हजार ५४० रुग्ण बरेही झाले आहेत. तर आतापर्यंत ३ हजार ७०९ पुणेकरांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. शहरातील ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या १४ हजार १८४ असून त्यापैकी ९२५ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यातील ४२८ रुग्णांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. मागील काही दिवसांपुर्वी व्हेंटीलेटरवर असलेल्या रुग्णांची संख्या पाचशेच्या पुढे होती. तर दररोज ५५ ते ६० रुग्णांचा मृत्यू होत होता. ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी होत असताना ऑक्सीजनची गरज असलेल्या रुग्णांचेही प्रमाणही जवळपास ६०० ने कमी झाले आहे. यामुळे मागील महिन्यांत उपचारांसाठी रुग्णालयांत बेडस्च्या शोधासाठी धावपळ करण्याचे प्रमाण कमी झाले आहे.  दरम्यान, आज शहरात ४ हजार ३३४ संशयितांचे स्वाबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. कोरोना रुग्णांच्या टेस्टसाठी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने ५० हजार अँटीजेन कीटस खरेदी करण्याच्या प्रस्तावाला आज मान्यता दिल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.