कोरोना काळ म्हणजे सहकार्याचा प्रयोग -सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर

'देणे समाजाचे' या उपक्रमाच्या माध्यमातून कितीतरी संस्था, मुले, अपंग यांना मदत मिळते, याचा आम्हाला आनंद आहे. अशा संस्थाच्या उदरनिर्वाहासाठी काहितरी करणे आवश्यक आहे. कोरोना काळात सगळ्यांवरच आर्थिक संकट आले आहे. परंतु तरीही पुणे आणि मुंबईकरांचे दातृत्त्व मोठे आहे

पुणे: सामाजिक संस्थांसमोर कोरोनाने मोठे प्रश्न निर्माण केले. लॉकडाऊनमध्ये संस्थांमधील मुले अडकून पडली. परंतु अनेकजण मदतीसाठी धावून आले. कोरोना काळ म्हणजे सहकार्याचा प्रयोग होता. सहकार्य, सामंजस्य माणूसकी हे सगळं आपल्यामध्ये असतंच प्रसंग आला की हे सगळं दिसून येतं, हे सांगणारा मागील ८ महिन्यांचा काळ होता. आपण माणूस आहोत त्यामुळे दुसऱ्याची संवेदना आपल्याला जाणवतेच. हे प्रसंगानुरुप उभं राहतं परंतु नंतरही ते विरुन जाता कामा नये. असे मत सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर यांनी व्यक्त केले.

स्मृती साधना संस्थेच्या वतीने कोरोना काळात सामाजिक कार्य करणाऱ्या कोविड योद्धयांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन नवी पेठेतील पत्रकार भवन येथे करण्यात आले होते. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या वीणा गोखले, विवेक वेलणकर, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवकुमार, संचालिका अवंतिका हिरेमठ, सचिव आश्विनी कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.

रेणू गावस्कर म्हणाल्या, आपल्या आसपास सामाजिक युद्ध सुरु आहे. स्त्री-पुरुष असमानता, शिक्षणाचा अभाव, दारिद््रयाचा उद्गम याशिवाय दर ८ मिनिटाला देशातील १ मूल हरवते. यातील ६० टक्के मुले कुठे असतात याचा शोध लागत नाही. असे असंख्य प्रश्न समाजाच्या पुढे आहेत. याची उत्तरे शोधायला हवीत, असेही त्यांनी सांगितले.

वीणा बापट म्हणाल्या, देणे समाजाचे या उपक्रमाच्या माध्यमातून कितीतरी संस्था, मुले, अपंग यांना मदत मिळते याचा आम्हाला आनंद आहे. अशा संस्थाच्या उदरनिर्वाहासाठी काहितरी करणे आवश्यक आहे. कोरोना काळात सगळ्यांवरच आर्थिक संकट आले आहे. परंतु तरीही पुणे आणि मुंबईकरांचे दातृत्त्व मोठे आहे. त्यामुळे अनेक संस्थांना मदत करणे शक्य झाले. विवेक वेलणकर म्हणाले, कोरोना काळ हा सर्वासाठी बिकट काळ होता. परंतु अनेक चांगल्या गोष्टी देखील बाहेर आल्या. अनेक जणांनी समाजासाठी काम केले आहे, असेही त्यांनी सांगितले. शिल्पा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.