कोरोना उपचाराचे दर ग्रामीण भागासाठी वेगळे राहणार; राहुल कुल यांच्या प्रयत्नांना यश

  यवत : कोरोना उपचाराचे दर हे शहर आणि ग्रामीण भागात निश्चित करून ते वेगळे असावेत, अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात सातत्याने केली होती. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले असून, आता राज्यात कोरोना उपचार खर्चाचे दर शहर आणि ग्रामीण भागासाठी वेगळे राहणार आहेत. याचा ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती राहुल कुल यांनी दिली.

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी झालेल्या बैठकीत राहुल कुल यांनी ही मागणी सातत्याने केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी नुकताच निर्णय घेतला असून, रुग्णालयाचे दर शहराच्या वर्गीकरणानुसार करण्यात आले आहे. यापुढे ग्रामीण भागातील रुग्णांना कोरोना उपचार खर्चात मोठा दिलासा मिळणार आहे.

  शहराच्या वर्गीकरणानुसार आकारणार दर

  यापूर्वी सर्व ठिकाणी व्हेंटिलेटर, आयसीयू व विलगीकरण यासाठी ९,००० रुपये, केवळ आयसीयू व विलगीकरण ७,५०० रुपये, वार्डमधील नियमित विलगीकरण 4,000 (प्रतिदिन) रुपये हा दर आकारला जात होता. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना याचा फार मोठा भुर्दंड सहन करावा लागत होता. यामध्ये बदल करून शहराच्या वर्गीकरणानुसार दर आकारण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

  गटनिहाय विभागणी

  अ, ब, क अशा गटात शहरी व ग्रामीण भागातील विभागणी केली आहे. त्यामुळे यापुढे शहर व ग्रामीण भागात कोरोना उपचार खर्च दर वेगळा असेल. पर्यायाने शहरांपेक्षा ग्रामीण भागातील तुलनेने कमी खर्चात उपचार करता येईल. वार्ड नियमित (प्रतिदिन) विलगीकरण अ वर्ग शहर ४,००० रुपये, ब वर्ग शहर ३,५०० रुपये आणि क वर्ग शहर २,४०० रुपये यामध्ये आवश्यक तो देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधे, बेड, आणि जेवणाचा समावेश आहे. हेच दर शहरासाठी अ वर्ग ९,०००, ब वर्ग ६,७०० आणि क वर्ग ५,४०० असा असेल. यामध्ये आयसीयू व विलगीकरण शहरासाठी अ वर्ग ७,५००, ब वर्ग ५५०० आणि क वर्ग ४,५०० असेल, वाढीव बिलाचे ऑडिट करावे, गैरप्रकाराला आळा घालावा. खाजगी रुग्णालयातून होणारी लूट थांबविण्यात यावी, अशाही मागण्या आमदार कुल यांनी केल्या आहेत.