corona vaccine

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडून तयार करण्यात येत असलेल्या कोरोना लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. ऑक्सफर्ड आणि अस्ट्राझेन्का या लसीचं एकत्रित उत्पादन करत आहेत. या लसीला मान्यता देण्याबाबत तर सरकारनं तातडीनं पावलं उचलली तर डिसेंबर महिन्यातदेखील कोरोनाची लस उपलब्ध होऊ शकते, असं पुण्यातील लस उत्पादन सुरू असलेल्या कंपनीतील एक अधिकाऱ्यानं खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.

या लसीचं उत्पादन भारतात सीरम इन्स्टिट्युट करतेय. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सीरम इन्स्टिट्यूटमधून २०२१ सालच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत १० कोटी लसींचं उत्पादन होईल, असा अंदाज आहे.

चाचणीच्या निकालाची प्रतीक्षा

“आपण जर इमर्जन्सी लायसन्ससाठी प्रयत्न केला नाही, तर डिसेंबरअखेरपर्यंत कोरोना लसीच्या चाचण्या पूर्ण होतील. त्यानंतर जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात कदाचित भारतात ही लस उपलब्ध होईल. अर्थात, लंडनमध्ये होणाऱ्या चाचण्यांच्या निकालावरही बरंच काही अवलंबून असेल”, असं सीरम इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, कोरोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी यशस्वी झाल्यानंतर भारत सरकारकडून तातडीनं इमर्जन्सी लायनन्ससाठी हालचाली केल्या जातील. त्या वेळची भारतातील कोरोनाची स्थिती पाहून याचा निर्णय घेतला जाईल, असंही समजतंय.

तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचं काम दोन ते तीन आठवडे चालेल, असा अंदाज आहे. या काळात जर सरकारनं इमर्जन्सी लायसन्ससाठी प्रयत्न केले, तर डिसेंबरमध्येच कोरोना लस उपलब्ध होऊ शकते, असा अंदाज आहे. मात्र परिस्थितीचा सरसकट विचार करूनच सरकार निर्णय घेईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.