फक्त २५० रुपयांत मिळणार कोरोनाची लस ; मोदी सरकारचा सीरम कंपनीशी करार

नवी दिल्ली: भारतीय नागरिकांना फक्त २५० रुपयांत  कोविशील्ड ही कोरोना लस मिळणार आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला (Serum) भेट दिल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. कोविशील्ड ही लस मोठ्याप्रमाणावर उपलब्ध करून देण्यासाठी मोदी सरकारने ‘सीरम’शी करार केला आहे.

कोविशील्ड लशीच्या आपातकालीन वापराला परवानगी मिळवी यासाठी सीरम कंपनीने केंद्र सरकारकडे विनंती केली होती. लवकरच सीरमला लशीच्या वापरासाठी परवानगी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, मोदी सरकार सीरम कंपनीशी करार करण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे.

केंद्र सरकार आणि सीरम इन्स्टिट्युटमधील हा करार अंतिम टप्प्यात असल्याची महितीही सुत्रांकडून मिळाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात सीरम केंद्र सरकारला ६  कोटी डोस उपलब्ध करून देणार असल्याचीही चर्चा आहे. यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारीपर्यंत १० कोटीपर्यंत डोस उपलब्ध होणार आहेत.

पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवक आणि वृद्ध व्यक्तींना कोरोनाची लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला कोविशिल्डचे दोन डोस देणे गरजेचे आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या यादीतील ३ कोटी लोकांसाठी ६ कोटी डोसची गरज आहे. ही लस साधारण मार्च ते एप्रिल महिन्यात बाजारपेठेत उपलब्ध होईल. खुल्या बाजारपेठेत या लशीची किंमत ६०० ते ६०० रुपये इतकी असण्याची शक्यता आहे.