शिवतक्रार म्हाळुंगीत एकाला कोरोनाची लागण

परिसरात भीतीचे वातावरण तर नागरिकांना सतर्कतेचे आवाहन शिक्रापूर : शिवतक्रार म्हाळुंगी ता. शिरूर येथील एका ८० वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती शिरुर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.

परिसरात भीतीचे वातावरण तर नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

शिक्रापूर  : शिवतक्रार म्हाळुंगी ता. शिरूर येथील एका ८० वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती शिरुर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी दिली. गेल्या चार दिवसात येथे दुसरा रुग्ण आढळून आल्याने व शिरुर तालुक्यात अधून मधून सातत्याने कोरोणा बाधित रुग्ण आढळून येत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे व तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या  वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी भेट देऊन पाहणी केली व खबरदारीच्या उपाययोजना संदर्भात सूचना केल्या आहेत .      

             शिवतक्रार म्हाळुंगी ता. शिरूर येथील एक ८० वर्षीय वृद्ध व्यक्ती कोरोना बाधीत झाली  आहे. शिवतक्रार म्हाळुंगी येथील एक २५ वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर कुटुंबातील व्यक्ती व शिक्रापूर येथील  खाजगी रुग्णालयातील डॉक्टर व स्टाफ असे ११ जणांचे स्वॅब तपासणीसाठी लॅबला पाठवले होते या सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. मात्र नव्याने बाधीत झालेले वृद्ध हे बाधीत युवकाचे आजोबा असून त्यांना त्रास जाणवू लागल्या नंतर त्यांची  कोरोना तपासणी केली असता त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. छोट्याशा गावात दोन कोरोना रुग्ण आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. याबाबत माहिती प्राप्त होताच शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे, तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रज्ञा घोरपडे, आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे, ग्रामविकास अधिकारी नंदकुमार वैद्य, तलाठी अमोल थिगळे  आदींनी शिवतक्रार म्हाळुंगी येथे धाव घेत परिसरात ग्रामपंचायतच्या वतीने फवारणी सुरु केली असून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. बाधिताच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींची माहिती काढण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. यावेळी प्रशासनाकडून शिवतक्रार म्हाळुंगी येथे कोरोना बाधित  आढळून आलेल्या ठिकाणाजवळील काही परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला असून त्या ठिकाणी देखील औषध फवारणी करण्यात आली आहे. तसेच येथे आरोग्य अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या वतीने वेगवेगळ्या तपासण्या करण्यात येणार असून नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे काम देखील सुरु करण्यात आले आहे.


संपर्कातील इतर व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरु – डॉ. राजेंद्र शिंदे.

शिवतक्रार म्हाळुंगी ता. शिरूर येथील एक वृद्ध कोरोना बाधीत झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील इतर व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरु आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे व विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी केले आहे.