वार्ताहर पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन

कोरोनाच्या काळात प्रत्यक्ष फील्डवर काम करणाऱ्या एका पत्रकाराला वेळेत उपचार न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागणं ही धक्कादायक बाब आहे.

टीव्ही 9 मराठीचे पुणे ((TV9 Marathi Pune ) ) प्रतिनिधी पांडुरंग रायकर (Reporter Pandurang Raykar ) यांचं आज बुधवारी कोरोनामुळे निधन झालं (dies due to corona) आहे. ते ४२ वर्षांचे होते. कोरोनाच्या काळात प्रत्यक्ष फील्डवर काम करणाऱ्या एका पत्रकाराला वेळेत उपचार न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागणं ही धक्कादायक बाब आहे.

पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमधे त्यांच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरू होते. मात्र त्यांची परिस्थिती खालावत होती. त्यामुळे त्यांना दुसऱ्या खाजगी हॉस्पिटलमधे भरती करण्याचे प्रयत्न पुण्यातील पत्रकारांनी सुरू केले. मात्र, मंगळवारी त्यांची ऑक्सीजन पातळी ७८ पर्यंत खाली गेली. त्यांना जंबो हॉस्पिटलमधून दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी कार्डिॲक एम्ब्युलन्सची गरज होती. परंतु जेव्हा ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाली, तोपर्यंत उशिर झाला होता. त्यामुळे वायकर यांनी आज पहाटेच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला.

पुण्यासारख्या शहरात आपल्या शांत आणि संयमी पत्रकारितेने पांडुरंग रायकर यांनी आपली विशेष ओळख निर्माण केली होती. मूळचे नगर जिल्ह्यातील असलेले पांडुरंग रायकर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. ई टीव्ही मराठी, एबीपी माझा ते टीव्ही 9 मराठी असा पांडुरंग यांचा पत्रकारितेतील १५ वर्षांचा प्रवास असून शेती ते सिनेमा, क्रीडा ते राजकारण अशा विविध विषयांवर पांडुरंग यांनी वार्तांकन केलं आहे. पांडुरंग यांच्या निधनाने पुणे पत्रकारिता क्षेत्रासह राजकीय, सामजिक क्षेत्र आणि विविध मान्यवरांकडून शोक व्यक्त होत आहे.