शिक्रापुरातील कोविड सेंटर बंद; उपचार घेणाऱ्या ३०० रूग्णांना केले कोरोनामुक्त

    शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर)  येथे कोरोना रुग्णांना उपचार देण्यासाठी शिरूर हवेली मतदारसंघाचे आमदार अशोक पवार यांच्या संकल्पनेतून व पुणे जिल्हा परिषदेच्या पशु संवर्धन समितीच्या माजी सभापती सुजता पवार यांच्या नियोजनातून सुरु करण्यात आलेले कोविड सेंटर रूग्णाअभावी निरोप समारंभाने बंद करण्यात आले आहे.

    शिक्रापूर (ता. शिरुर) येथील त्रिमूर्ती गार्डन मंगल कार्यालय येथे प्रतिभा आरोग्य मंदिर नावाने कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. येथे तब्बल तीनशे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करत रुग्णांना कोरोना मुक्त करण्यात आले. सध्या सर्वत्र कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. रुग्णांअभावी कोविड सेंटर बंद राहत असल्याने कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

    सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान

    शेवटी राहिलेल्या दोन कोरोनाबाधित रुग्णांना झाड देऊन सन्मानित करत घरी सोडण्यात आले. दरम्यान रुग्णांना सेवा देणारे डॉ. स्वप्नील काळे, डॉ. सुहास बांगर, डॉ. शिंदे यांच्यासह आरोग्य कर्मचारी व सेविका, बंदोबस्त ठेवणारे पोलीस कर्मचारी, कोविड सेंटरला जेवण पुरविणारे सुखदेव भुजबळ, कोविड सेंटरसाठी कार्यालयाचे सहकार्य देणारे आप्पासाहेब भुजबळ यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, शिरुर तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष ॲड. सुदिप गुंदेचा, ग्रामपंचायत सदस्य गोविंद ढमढेरे, अमोल गायकवाड आदी उपस्थित होते.