यमुनानगरमधील कोविड लसीकरण केंद्रामुळे झाली नागरिकांची सोय ; मनसे गटनेते सचिन चिखले यांनी मानले पालिका प्रशासनाचे आभार

प्रभागातील लोकसंख्येच्या तुलनेत एका सेंटरवर पडणारा ताण कमी करण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे क्रिडांगण येथे दुसरे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी मनसे शहराध्यक्ष तथा पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गटनेते सचिन चिखले यांच्या पुढाकारामुळे लसीकरण केंद्र सुरू झाली आहेत.

    पिंपरी : कोरोना विषाणूवर यशस्वी मात करण्यासाठी प्रभाग क्रमांक १३ निगडी सेक्टर २२ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत यमुनानगर रुग्णालयात आणि यमुनानगरमधील प्रबोधनकार ठाकरे क्रिडांगण याठिकाणी दोन कोविड लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. प्रभागातील लोकसंख्येच्या तुलनेत एका सेंटरवर पडणारा ताण कमी करण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे क्रिडांगण येथे दुसरे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी मनसे शहराध्यक्ष तथा पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गटनेते सचिन चिखले यांच्या पुढाकारामुळे लसीकरण केंद्र सुरू झाली आहेत.

    प्रभाग क्रमांक १३ सेक्टर २२ मधील यमुनानगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत यमुनानगर रुग्णालयात पहिले कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, संपूर्ण यमुनानगर प्रभागातील नागरिकांची लसीकरणासाठी रांग लागल्यामुळे या केंद्रावरचा ताण वाढू लागला. हा ताण कमी करण्यासाठी गटनेते सचिन चिखले यांनी पालिका प्रशासनाशी संपर्क साधून आणखी एक कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली. त्यावर पालिका प्रशासनाला प्रबोधनकार ठाकरे क्रिडांगणावरील मध्यवर्ती जागेची सूचना केली. त्याला प्रतिसाद देत मनपा प्रशासनाने मंगळवारी (दि. २३) मंजुरी दिली. याबद्दल सचिन चिखले यांनी पालिका आयुक्त व प्रशासनाचे आभार मानले आहेत.

    दोन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू केल्यामुळे नागरिकांची सोय झाली आहे. यमुनानगर, साईनाथ नगर, सेक्टर २२ व निगडी गावठाण भागातील नागरिकांना लसीकरणाचा लाभ घेता येत आहे. सध्या ज्येष्ठ व गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना तातडीने लस देण्यात येत आहे. प्रभागातील नागरिकांनी लसीकरणाचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, तसेच नागरिकांनी समस्या असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन चिखले यांनी केले आहे.

    कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. ६० वर्षापुढील व्यक्तींनी गाफील न राहता लसीकरण केंद्रात जाऊन लस टोचून घ्यावी. आपल्या प्रभागात दोन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू केली आहेत. प्रभागातील ६० वर्षापुढील सर्व ज्येष्ठ नागरिकांना लस द्यायची आहे. पुढच्या टप्प्यात सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ४५  वर्षापुढील व्यक्तींना लस दिली जाणार आहे.