विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा

तुझ्या आईने लग्नामध्ये काही हौसमौज केली नाही. तसेच लहान-लहान कारणावरून तिला वाईट शिवीगाळ करून मारहाण केली. या त्रासाला कंटाळून सलोनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

    पिंपरी: हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सलोनी दिनेश रोकडे (वय १९) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पती दिनेश आनंद रोकडे, सासरे आनंद रोकडे, दीर नितीन आनंद रोकडे आणि दोन महिला आरोपी (सर्व रा. आडेगाव, अबोली, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. विवाहितेच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    फिर्यादी यांची मुलगी सलोनी हिचे १८ ऑक्टोबर २०२० रोजी आरोपी दिनेश रोकडे याच्याशी लग्न झाले. लग्नानंतर सासरी नांदत असताना आरोपींनी आपसात संगनमत करून सलोनी हिला तुला स्वयंपाक नीट करता येत नाही. तुझ्या आईने लग्नामध्ये काही हौसमौज केली नाही. तसेच लहान-लहान कारणावरून तिला वाईट शिवीगाळ करून मारहाण केली. पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्या महिलेचे ऐकू न सलोनीला दिनेश मारहाण करत असे. तसेच व्यवसायासाठी दोन लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी आरोपी करत होते. ती मागणी पूर्ण न झाल्याने तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून सलोनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. चिखली पोलीस तपास करत आहेत.