सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे महिलेवर पाळत सोसायटी चेअरमनसह तिघांवर गुन्हा

पीडित महिलेवर सीसीटीव्हीद्वारे पाळत ठेऊन त्यांचे चित्रीकरण केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

    पिंपरी:एका सोसायटीचे चेअरमन, सचिव आणि खजिनदाराने महिलेच्या बेडरूमच्या दिशेने सीसीटीव्ही कॅमेरा लावून महिलेवर पाळत ठेवली. महिलेचे खासगी व्हिडीओ बनवून पाहिले. महिलेने सीसीटीव्ही कॅमेरा काढण्यास सांगितले असता त्यासाठी नकार दिला. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ५ ते २८ सप्टेंबर या कालावधीत हिंजवडी येथे घडला.

    पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सोसायटीचा चेअरमन गणेश शंकर आवटे, सचिव सागर शिंदे आणि खजिनदार देवेंद्र सारंगधर या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेला माहिती होऊ न देता त्यांच्या परवानगीशिवाय महिलेच्या बेडरूमच्या खिडकीच्या दिशेला तोंड करून आरोपींनी कॅमेरा बसवला. पीडित महिलेचा व्हिडीओ बनवून तो आरोपींनी पाहिला. हा प्रकार पीडित महिलेच्या निदर्शनास आला. त्यामुळे त्यांनी आरोपींना कॅमेरा काढण्यास सांगितले. त्यावर आरोपींनी कॅमेरा काढण्यास नकार दिला. पीडित महिलेवर सीसीटीव्हीद्वारे पाळत ठेऊन त्यांचे चित्रीकरण केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.