धक्कादायक ! प्रेमसंबंधास अडथळा ठरणाऱ्या भावाचा भावजयच्या मदतीने डोक्यात दगड घालून खून ; भावासह भावजयवर गुन्हा

बारामती : प्रेमसंबंधास अडथळा ठरणा-या भावाचा भावजयच्या मदतीने डोक्यात दगड घालून खून करुन मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दिल्याचा गंभीर प्रकार सुपे (ता बारामती) येथील कुतवळवाडी याठिकाणी उघडकीस आला आहे.याप्रकरणी भावासह भावजयवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

रामदास विठ्ठल महानवर (वय २७)असे मयताचे नाव आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी मयताची पत्नी ताई रामदास महानवर व भाऊ गणेश महानवर या दोघांना अटक केली आहे. रामदास हा बेपत्ता झाल्याची फिर्याद गणेश महानवर याने दि २५ नोव्हेंबर रोजी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात दिली होती. या घटनेनंतर तपास करत असताना रामदास याचा मृतदेह कुतवळवाडी परीसरातील विहिरीत दि २८ नोव्हेंबर रोजी तरंगताना आढळून आला. हा मृतदेह बाहेर काढला असता, २० ते २५किलो वजनाच्या दगडाने वायरच्या सहाय्याने बांधल्याचे दिसून आले.तसेच डोक्यावर गंभीर वार केल्याचे दिसून आले.यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला. यानंतर लांडे यांनी तपास सुरू केला. या तपासात मयताची पत्नी ताई व भाऊ गणेश हे दोघे विसंगत माहिती देत असल्याचे लक्षात आले. पोलिसी खाक्या दाखवताच मयताची पत्नी ताई हिने दिर गणेश याच्याबरोबर प्रेमसंबंध असल्याचे सांगून पती रामदास हा प्रेमसंबंधास अडसर ठरत होता, त्यामुळे त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला, त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दिल्याची कबूली दिली.