police
प्रतिकात्मक फोटो

दोन महिन्यांपूर्वी आरोपी किशोर हा मारूंजी येथे भाजी विक्री करीत असल्याची माहिती फिर्यादी सविता यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी मारूंजी येथे जाऊन आरोपी किशोर याला आपल्या मुलीबाबत विचारणा केली. मात्र त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली.

     पिंपरी: लग्नाचे आमिष दाखवून प्रियकराने प्रियसीचे अपहरण केले. त्यानंतर तिचा खून केला. याप्रकरणी तब्बल दहा वर्षांनी खूनाचा गुन्हा दाखल झाला असून आरोपी प्रियकराला अटक केली आहे.

    किशोर लक्ष्मण घारे (वय ३२, रा. मु. पो. डाणे, ता. मावळ, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सविता सत्यवान लांडगे (वय ५२, रा. बलदेवनगर, पिंपरी) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची मुलगी (वय २२) हि हिंजवडी येथे कामाला होती. त्यावेळी तिचे आरोपी किशोर याच्या सोबत प्रेमसंबंध होते. ते दोघे लग्नही करणार होते. मात्र काही दिवसांपासून आरोपी किशोर हा लग्न करण्यास टाळाटाळ करीत होता. त्यामुळे त्यांच्यात वादही झाला होता.

    आरोपी किशोर हा ११ सप्टेंबर २०११ रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास फिर्यादी सविता यांच्या घरी आला. चल आपण लग्न करू, असे म्हणत तो फिर्यादी यांच्या मुलीला दुचाकीवरून घेऊन गेला. त्यानंतर काही दिवस किशोर आणि फिर्यादी यांच्या मुलीचा फोन लागला नाही. लग्नानंतर ते गावी गेले असतील त्यामुळे फोन लागला नसावा, असे फिर्यादी सविता यांना वाटले. मात्र काही दिवसांनंतर आरोपी किशोर याचा फोन लागला. आम्ही लग्न न केल्याने तुमची मुलगी त्याच दिवशी मला सोडून गेल्याचे आरोपी किशोर याने सांगितले. काही दिवसांनी आपली मुलगी परत येईल, असे सविता यांना वाटले. मात्र मुलगी परत आलीच नसल्याने त्यांनी २७ जुलै२०१३ रोजी मुलगी बेपत्ता असल्याची फिर्याद पिंपरी पोलीस ठाण्यात दिली.

    दोन महिन्यांपूर्वी आरोपी किशोर हा मारूंजी येथे भाजी विक्री करीत असल्याची माहिती फिर्यादी सविता यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी मारूंजी येथे जाऊन आरोपी किशोर याला आपल्या मुलीबाबत विचारणा केली. मात्र त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. आरोपी किशोर याने आपल्या मुलीला अज्ञात ठिकाणी नेऊन जीवे मारल्याची खात्री झाल्याने त्यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.