शिरूरमध्ये विद्युत वितरण कार्यालय फोडणाऱ्या तिघांवर गुन्हे

-वाढीव वीज बिलाच्या विरोधात मनसेचे खळखळ्याट आंदोलन प्रकरण

शिक्रापूर : शिरूर ता. शिरूर येथील विद्युत वितरण कार्यालयात घुसून सरकारी कार्यालयाची तोडफोड केल्या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिघांवर सरकारी कामात अडथळा आणत सरकारी कार्यालयाचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती शिरूर पोलिसांनी दिली आहे.

शिरूर ता. शिरूर येथील विद्युत वितरण कार्यालय नियमितपणे सुरु असताना दुपारच्या सुमारास अचानक तिघे जण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हातात घेऊन कार्यालयात आले व त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, वाढीव लाईट बिल कमी झालेच पाहिजे अशा घोषणा देण्यास सुरवात केली, यावेळी तिघांनी सदर कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता हितेंद्र भिरूड यांच्या केबिनमध्ये जात सदर अधिकाऱ्याची खुर्ची टेबलावर आपटून, टेबलावरील महत्वाची कागदपत्रे फेकून देत टेबलावरील काच देखील फोडली, यावेळी सदर कार्यालयातील कनिष्ठ लिपिक हेमंत रायते, लेखा सहाय्यक प्रणव भोईर, सागर नवले, शिपाई सुनिता लोहार यांनी सदर युवकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता तिघांनी त्यांच्या अंगावर धावून जात दमदाटी केली आणि सर्वजण निघून गेले. याबाबत विद्युत वितरण विभाग शिरूर कार्यालयातील कनिष्ठ लिपिक शिवाजी परशुराम शिंदे रा. बाभुळसर खुर्द ता. शिरूर जि. पुणे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरूर पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते अविनाश घोगरे, सुशांत कुटे व रवींद्र गुळाने सर्व रा. शिरूर ता. शिरूर जि. पुणे यांच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा तसेच सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बिरुदेव काबुगडे करत आहे.