महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी दोन ठेकेदारांवर गुन्हे; कामे मिळवण्यासाठी सादर केले बनावट अनुभव दाखले

हिंदुस्थान अँटीबायोटीक्स या सरकारी कंपनीचा बनावट अनुभव दाखला तयार करुन पिंपरी - चिंचवड महापालिकेची १ कोटी २ लाख ९१ हजार रुपयांची पाणीपुरवठा विभागाची कामे मिळवली आणि महापालिकेची फसवणूक केली.

    पिंपरी: पिपरी – चिंचवड महापालिका पाणीपुरवठा विभागाची कामे मिळवण्यासाठी बनावट अनुभव दाखले सादर केल्याप्रकरणी दोन ठेकेदारांवर फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पहिल्या प्रकरणात महापालिका रामनाथ निवृत्ती टकले (वय ५५, रा. रावेत) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २४ मार्च २०१९ रोजी घडला आहे. त्यानुसार, राजेश इंजिनियर्स अ‍ॅण्ड कंपनीचे मालक रेवजी सहादु घाडगे (वय ६९, रा. ए. जे. चेंबर्स, खराळवाडी, पिंपरी) याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी घाडगे यांनी हिंदुस्थान अँटीबायोटीक्स या सरकारी कंपनीचा बनावट अनुभव दाखला तयार करुन पिंपरी – चिंचवड महापालिकेची १ कोटी २ लाख ९१ हजार रुपयांची पाणीपुरवठा विभागाची कामे मिळवली आणि महापालिकेची फसवणूक केली.

    दुसऱ्या प्रकरणात महापालिकेचे सहशहर अभियंता प्रवीण विठ्ठल लडकत (वय ५७, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ७ जानेवारी २०२१ रोजी घडला आहे. त्यानुसार, संजीव प्रिसीजनचे मालक संजीव यशवंत चिटणीस (वय ६५, रा. महेश सोसायटी, बिबवेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चिटणीस याने पाणीपुरवठा विभागाची निविदा मिळवण्यासाठी पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील क्लोरीन गॅस सिलींडर साठवणुकीसाठी शेड बांधणे, दहा किलो क्षमतेचे क्लोरीनेटर्स पुरविणे, क्लोरीन न्युट्रलायझेशन यंत्रणा बसविणे अशी कामे केली असल्याचा कार्यकारी अभियंता (विद्युत) कार्यालयाकडील २९ नोव्हेंबर २०१८ रोजीचा बनावट अनुभव दाखला तयार करून महापालिकेस सादर केला आणि महापालिकेची फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.