खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद; गावठी पिस्टल व दोन ‌काडतुसे हस्तगत

    बारामती : बारामती तालुका गुन्हे पथकाने बारामतीमध्ये खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी शुभम विकास राजापुरे (वय २४, मुर्टी,ता.बारामती) याला जेरबंद केले असून, त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.

    गेल्या महिनाभरापूर्वी बारामती परिसरामध्ये माळेगाव येथे गोळीबार केल्याची घडना घडल्याने बारामती तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महेश ढवाण यांनी बारामती परीसरात कोंबिंग ऑपरेशन तसेच नाकाबंदी करून रेकाॅर्डवरील आरोपी चेक करण्याची मोहीम आखली. त्यासंदर्भात योग्य ते मार्गदर्शन गुन्हे पथकाला केले. त्याप्रमाणे गुन्हे पथकातील अंमलदार बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन, रेकार्डवरील आरोपी तसेच माहितीगार गुन्हेगार चेक करण्याची मोहीम सुरू असताना गुप्त माहितीदारामार्फत मिळालेली माहिती अशी की, खुनाच्या गुन्ह्यातील जामीनावर असणारा शुभम विकास राजापुरे हा येरवडा जेलमधून पॅरोल रजेवर बाहेर आलेला आहे. सध्या त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्टल असुन तो कमरेला लावुन फिरत असतो, अशी खात्रीलायक माहिती मिळाली.

    पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी गुन्हे शोध पथकाला बोलावून सूचना देऊन त्यास ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी माहिती घेवून शुभम राजापुरे हा तांदुळवाडी मध्ये येणार असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी सापळा रचुन शुभम राजापुरे याला ताब्यात घेतले. त्याच्या कंबरेला डाव्या बाजुस एक गावठी बनावटीचे पिस्टल, त्यामध्ये मॅग्झीन व दोन जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले आहे.

    हे पिस्टल अग्नीशस्त्राच्या परवान्याबाबत विचारले असता त्याने परवाना नसल्याबाबत सांगितले. या आरोपीस ताब्यात घेवून त्याच्यावर आर्म अॅक्ट ३(२५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते , उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर, बारामती तालुका पो.स्टे चे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दादासाहेब ठोंबरे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार राहुल पांढरे, नंदू जाधव,विजय वाघमोडे,विनोद लोखंडे,रणजित मुळीक यांनी केली.