दारूची दुकाने उघडताच तळीरामांनी केली तुफान गर्दी

वाघोली : (ता. हवेली) वाघोलीतील दारूची दुकाने सोमवारी (दि.४) दुपारी उघडल्यानंतर नागरिकांनी दारूच्या दुकानासमोर प्रचंड गर्दी केली.

 तळीरामांच्या गर्दीला पोलिसांनी लावले पिटाळून

वाघोली : (ता. हवेली) वाघोलीतील दारूची दुकाने सोमवारी (दि.४) दुपारी उघडल्यानंतर नागरिकांनी दारूच्या दुकानासमोर प्रचंड गर्दी केली. दारू दुकानासमोर झालेल्या गर्दीमुळे मात्र सोशल डीस्टन्सिंगचा फज्जा उडाला. वाघोली कंटेन्मेंट झोनमध्ये असल्याने इतर सर्वच दुकाने बंद असूनही दारूची दुकाने उघडल्याने पोलिसांनी उघडलेली दुकाने बंद केली. यामध्ये काही तळीरामांची चंगळ तर असंख्य तळीराम नाराज झाले.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील दारूची दुकाने सोमवारी उघडणार असल्याने वाघोलीतील वाईन शॉप समोर सकाळपासूनच तळीरामांनी रांगा लावल्या होत्या. वाघोलीतील कंटेन्मेंट झोनची परिस्थिती लक्षात घेता सकाळी वाईन शॉप समोरील तळीरामांच्या गर्दीला पोलिसांनी पिटाळून लावले. दुपारी उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने वाईनशॉप उघडण्याबाबतचे आदेश देण्यात आल्यानंतर वाघोलीतील वाईन शॉप उघडण्यात आली. वाईनशॉप उघडल्याची बातमी पसरताच तळीरामांची प्रचंड गर्दी झाली. वाईनशॉपच्या समोर तळीरामांच्या गर्दीने अक्षरशः सोशल डीस्टन्सिंगचा फज्जा उडाला.
-लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन
वाघोली कंटेन्मेंट झोनमध्ये असल्याने उघडलेले वाईन शॉप व गर्दीची माहिती समजताच लोणीकंद पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेऊन दुकाने बंद केली. गर्दी पांगविण्यासाठी तळीरामांना चोप देखील द्यावा लागला. दुपारी काही कालावधीसाठी दारूची दुकाने उघडी राहिल्याने काहींची चंगळ झाली तर असंख्य तळीराम नाराज झाले. मागील एक महिन्यापेक्षा जास्त काळ नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन केले. मात्र दारूचे दुकाने उघडताच उसळेल्या गर्दीमुळे एवढे दिवस लॉकडाऊन ठेऊन काही फायदा झाला नसल्याच्या तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटल्या आहेत.